मुंबई : महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी विविध विकास धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. गेल्या वर्षी राज्याने अर्ध्या ट्रिलियनचे उद्दिष्ट पार केले असून, २०२८ ते २०३० पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
फडणवीस यांच्या हस्ते वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेचे उद्घाटन झाले. माजी मंत्री आ. मंगल प्रभात लोढा, वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक स्वामी विद्यानंद, अध्यक्ष राजेश शर्मा, प्रमुख वक्ते टी. व्ही. मोहनदास पै यांच्यासह जगातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर बीकेसी येथे १३ ते १५ डिसेंबर असे तीन दिवस ही परिषद होणार आहे.
मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहेच, पण भविष्यात ती फिनटेकची राजधानी बनेल. भारताच्या प्रगतीने जगाला थक्क केले आहे. जगात तिसरी महासत्ता म्हणून भारत पुढे येत आहे. मोठी लोकसंख्या असलेला देश कशी प्रगती करू शकतो असे जग म्हणत आहे. परंतु, देशातील कुशल मनुष्यबळ हे विकासाचे महत्त्वाचे साधन आहे. विकासामध्ये प्रत्येकाला सोबत घेऊन जात असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रसुद्धा मोठ्या गतीने पुढे जात असून, सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी सल्लागार कमिटीची स्थापना केली आहे. समितीच्या माध्यमातून राज्य कोणत्या क्षेत्रात पुढे जाऊ शकते याचा अभ्यास करण्यात येत आहे. त्याआधारे विकासाची धोरणे आखली जात आहेत. जागतिक पातळीवर राज्य विकासाला पूरक अशी साखळी बनवत आहे, असे ते म्हणाले.
२०३० पर्यंत भारताला पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट २०२८ पर्यंतच पूर्ण करू. भारत ७ ट्रिलियन इकॉनॉमी किंवा ९ ट्रिलियनचेही उद्दिष्ट गाठू शकतो, असे आर्थिक संस्थांचे सर्वेक्षण समोर आले आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विकासावर अधिक भर देण्यात येत आहे, असे फडणवीस म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 14-12-2024













