मंडणगड : तालुक्यातील धुत्रोली येथील पशुधनाची चोरी झाल्या प्रकरणी मंडणगड पोलिसांनी चोवीस तासांच्या आत तत्परतेने कार्यवाही करीत या प्रकरणातील एका संशयितास अटक करण्यात यश मिळवले आहे. यामुळे या चोरी प्रकरणातील सर्व संशयितांच्या मुसक्या आवळल्या जाण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. पोलिसांच्या २४ तासांमधील या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी मंडणगड ते धुत्रोली पेट्रोल पंपानजीक असणाऱ्या गाई गुरांना इंजेक्शन व खाद्यातून भुलीचे पदार्थ देऊन चोरी करणाऱ्या एका संशयिताच्या मुसक्या आवळण्यात मंडणगड पोलिसांना दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी यश आले आहे.
या प्रकरणी मंडणगड पोलिसांनी जाफर अन्वर शेख (वय ३४) राहणार नेहरूनगर, वांगणी, एकविरा नगर या ठिकाणाहून एका संशयितास ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली पोलिस उपनिरिक्षक बी. धुपकर, अक्षय कुंभार, विनय पाटील या पोलिस पथकाने मंबई येथे जाऊन संशयितास ताब्यात घेण्याची कार्यवाही यशस्वी केली आहे.
मागील दहा वर्षांपासून होणाऱ्या पशुधनाच्या चोरीचा उलघडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी सीसीटीव्ही माध्यम व मंडणगड पोलिसांच्या गुप्त माहिती देणाऱ्यांच्या माध्यमातून उघडकीस आलेल्या या प्रकरणावरून ज्या शेतकऱ्यांचे पशुधन चोरीला गेले होते त्यांनी मंडणग़ड पोलिस ठाणे येथे धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने पोलीस पथक मुंबई येथे रवाना करण्यात आले. अनेक सीसीटीव्हीचे फुटेज तपासणी व पोलिसांचे गुप्त माहितीच्या आधारे सदर संशयितांपर्यंत पोहोचण्यास मंडणगड पोलिसांना यश आले आहे. मंडणगड पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा गुप्तपणे तपास केला. या प्रकरणात मंडणगड पोलिसांनी घटना घडल्यापासून त्याचा तपास करेपर्यंत कोणतीही माहिती उघड केली नाही. पोलिसांचे एक पथक या प्रकरणाचे धागेदोरे मुंबई ते मंडणगड असल्याकारणाने त्यांनी थेट मुंबई शहर गाठले. या प्रकरणात तपास करताना त्यांनी स्थानिक, मुंबई पोलिसांची मदत घेतली आणि नेहरूनगर, वांगणी, एकविरानगर, चुनाभट्टी या परिसरातील संशयिताच्या मुसक्या आवळल्या. त्यातील एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिस या संदर्भात अधिक धागेदोरे मिळत आहेत का या कामी तपास करीत आहेत. मंडणगड पोलिसांनी कार्यतत्परता कौतुकास्पद ठरली आहे. आता या चौकशीमध्ये कोणकोणते खुलासे होतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 16/Dec/2024









