दापोली बसस्थानकातील प्रवासी निवारा शेडची दुरवस्था; प्रवाशांमध्ये नाराजी

दापोली : दापोली एसटी बसस्थानकातील प्रवासी निवाराशेडची दुरवस्था झाली आहे. या निवाराशेडची अनेक महिने जैसे थे अशी स्थिती असून या प्रवासी निवारा शेडकडे बघण्यास एसटी प्रशासनाला वेळ नाही का? असा संतप्त सवाल आता प्रवाशांमधून उपस्थित होत आहे. प्रत्येक हंगामात दापोली एसटी बस आगाराला चांगले आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र, तरीही प्रवाशांसाठी असणाऱ्या सोयी-सुविधा या ठिकाणी प्रवाशांना मिळत नाही. यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या बसस्थानकातून विद्यार्थी, महिला, याचबरोबर ज्येष्ठ नागरिक दररोज मोठ्या संख्येने प्रवास करत असतात. तसेच लांब पल्ल्यांच्या आणि ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी बस वेळेत सुटत नसल्याने तासन्तास प्रवाशांना बसस्थानकात ताटकळत राहावे लागते. अशावेळी निवारा शेड नादुरुस्त असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. यामुळे प्रवाशांमधून संतप्त भावना उमटत आहेत. दापोली एसटी प्रशासनाने या प्रवासी निवारा शेडची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 16/Dec/2024