हातखंबा येथे टँकरची दुचाकीला धडक बसून निवळीतील तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरीतील हातखंबा येथील दर्ग्याजवळ पाण्याच्या टँकरने दुचाकीस्वाराला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार शिशिर रावणंग या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याचे अपघाती निधन रत्नागिरीकरांना चटका लावून गेले. शुक्रवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

रत्नागिरी निवळी येथील शिशिर शांताराम रावणंग (वय 36, निवळी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दुचाकीला धडक देणारा टँकर हा मुंबई गोवा महामार्गाचे काम करणार्‍या एका कंपनीचा होता. शिशिर यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगात आलेल्या या टँकरने (क्र. एमएच 05 बीए 3677 ) जोरदार धडक दिली. त्या धडकेत शिशिर दुचाकीवरून रस्त्यावर फेकला गेला. त्यात तो गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाला. अपघातात रस्त्याच्या मधोमध पडलेल्या शिशिरला बाजूला करण्याचा प्रयत्न झाला. या अपघातानंतर टँकर चालक सोनू महतो (रा. झारखंड) हा फरार झाला होता.

महामार्गावरील हातखंबा दर्ग्याजवळ तीव्र वळण व उतार असल्याने अनेक अपघात होत असतात, मात्र या परिस्थितीचा विचार न करताच अनेक वाहनधारक गाड्या भरधाव मारत असतात. त्यातूनच हा अपघात घडला आहे. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने, जवळच राहणार्‍या आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेतली. त्यावेळी शिशिर गंभीर जखमी होऊन निपचित पडलेला होता. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, तेथे दाखल करताच वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषित केले. या अपघाताची माहिती हातखंबा, निवळ तसेच रत्नागिरी शहर परिसरात पसरली असता, शिशिरच्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. संतप्त नागरिकांनी टँकर चालकावर गुन्हा दाखल करुन अटकेची मागणी केली.

शिशिर हा यापूर्वी रत्नागिरीत विवो कंपनीमध्ये क्षेत्रीय व्यवस्थापक म्हणून काम करत होता. अलीकडेच तो एअरटेल कंपनीत याच पदावर कामावर रुजू झालेला होता. शुक्रवारी रात्री 8.15 वाजता तो लांजा येथील आपले काम संपवून निवळी येथील आपल्या घरी निघाला होता. यावेळी हातखंबा येथील दर्ग्याजवळ ही घटना घडली. शिशिर त्याच्या कुटुंबियाचा आधार होता. आई, वडील, मोठा विवाहित भाऊ, भावजय अशा सर्वाची जबाबदारी तो सांभाळत होता. त्याच्या निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी दुपारी या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.गुन्ह्याचा अधिक तपास हे. कॉ. रुपेश भिसे करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 16-12-2024