चिपळूण : मुंबई-गोवा महामार्ग रूंदीकरण अंतर्गत परशुराम घाट तर शहरातील बहादूरशेख ते प्रांत कार्यालयापर्यंतच्या उड्डाण पुलाची उभारणी संदर्भात गेली काही वर्षे मोठ्या दुर्घटनांमुळे तांत्रिक अडथळे आणि अडचणी निर्माण होत असून अभियंते व संबंधित तंत्रज्ञांनी या बाबत केलेल्या कामाच्या मूळ आराखड्याच्या सुरक्षा व दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुर्घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी ठेकेदार, महामार्ग विभाग, संबंधित अभियंते व तंत्रज्ञ यांची टीम दाखल होऊन घडलेल्या दुर्घटनेवर कायमस्वरूपी उपायाचे नियोजन व अभ्यास, संशोधन करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत सुरू झाल्याने ‘वरातीमागून घोडे’ अशी परिस्थिती महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत असलेल्या परशुराम घाट व शहरातील उड्डाण पुलाची झाली आहे. परिणामी गेली दहा वर्षे परशुराम घाट व शहरातील बहादूरशेखपासूनच्या उड्डाण पुलाचे काम पूर्ण होण्यास अनिश्चित कालावधीसह असुरक्षित व धोका वाढत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला प्रत्यक्षात सुरुवात होऊन १५ वर्षांचा कालावधी लोटला आहे. चिपळूणनजिक परशुरामपासून शहराकडे येणाऱ्या पाग पॉवर हाऊसपर्यंतच्या रूंदीकरण कामाला अद्याप पाहिजे तशी गती आलेली नाही. या दरम्यान कामातील चुकांमुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. गेल्या दहा वर्षात शहरात्तील उड्डाण पुलाचे काम तसेच परशुराम घाटातील रुंदीकरण अंतर्गत भराव व डोंगर कटाईचे काम सुरूच आहे. जसजशा दुर्घटना घडतील तसतसे तांत्रिक तपासणीचे नियोजन संबंधित अभियंते व तंत्रज्ञांकडून केले जात असल्याने वरातीमागून घोडे नाचविण्याच्या या प्रकारामुळे घाट आणि शहरातील उड्डाण पूल कायमस्वरूपी असुरक्षित नि धोकादायक ठरला आहे.
परशुराम घाटात गेल्या दोन ते तीन वर्षांत भराव टाकून व एका बाजूला डोंगर कटाई करून रूंद केलेल्या मार्गावर पावसाळी हंगामापासूनच आजपर्यंत अनेक छोट्या-मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. प्रामुख्याने गेल्या महिनाभरात वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे तर दुसऱ्या बाजूला भरावाच्या ठिकाणी रस्ता व संरक्षक भिती कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. काही ठिकाणी संरक्षक भिंत असलेल्या डोंगराच्या बाजूकडील दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. शहरात बहादूरशेख ते प्रांत कार्यालय दरम्यान निर्माणाधीन असलेल्या उड्डाण पुलाच्या कामातील चुकीच्या घोळामुळे दोन ते तीनवेळा दुर्घटना घडल्या आहेत. या दोन्ही ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांनंतर संबंधित ठेकेदार कंपनी तसेच महामार्ग विभाग व तंत्रज्ञ, अभियंते घटनास्थळी भेट देऊन या मागील कारणांचा शोध घेण्याचे नियोजन करताना दिसून येत आहेत. मात्र, प्रत्यक्षात काम सुरू करण्यापूर्वी तांत्रिकदृष्ट्या अभियंत्यांकडून संबंधित जागेची सर्वंकष पाहणी, जमिनीची ताकद, दगड, हवा, पाणी अशा सर्व नैसर्गिक बाबींचा अभ्यास व समतोल साधून त्या दृष्टीने सुरक्षित डिझाईन व नियोजन होणे गरजेचे असताना अशाप्रकारे कोणतेही नियोजन केले नसावे हे या दुर्घटनांवरून आता उघड होऊ लागले आहे. उड्डाण पुलाच्या कामात दोनवेळा कोसळण्याची दुर्घटना घडल्यानंतर ठेकेदार कंपनी व महामार्ग विभागातील संबंधित अधिकारी, तंत्रज्ञांनी आता नवे डिझाईनचे आरेखन करून नव्याने पुलाचे काम हाती घेतले आहे. तसेच परशुराम घाटातील खचलेला रस्ता व भराव आणि कोसळलेली भित याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी पुन्हा एकदा तंत्रज्ञांची टीम संशोधनासाठी दाखल झाली आहे. मुळातच घाटातील रस्ता रुंद करण्यासाठी सुमारे सत्तर ते ऐंशी टक्के भागात मूळ जुन्या रस्त्यावर लाखो ब्रासचा भराव करून हा भाग दहा ते पंधरा फूट उंच करण्यात आला.
दुसऱ्या बाजूला डोंगर कटाई करून कमकुवत संरक्षक भिंती बांधण्यात आल्या. छोट्या टेकडीएवढ्या उंच भरावाच्या संरक्षणासाठी बांधलेल्या संरक्षक भिंती म्हणजे जादूई आधुनिक तंत्रज्ञानाची कमालच म्हणावी लागेल. अशा भिंती मूळ जुन्या रस्त्याच्या पृष्ठभागावर उभारण्यात आल्यामुळे या अधांतरीत भिंतीचा आधार नेमका भरावाला की भरावाचा आधार भिंतीला असे म्हणण्याची वेळ कोसळल्यानंतर आली आहे. दुर्घटना घडल्यावर आता संबंधित अभियंते व तंत्रज्ज्ञ व अभियंत्यांची टीम या ठिकाणी कारणांचे संशोधन व संबंधित ठिकाणच्या जमिनीखालील कठीण दगडाचा शोध घेण्यासाठी दाखल झाली असून एकप्रकारे वरातीमागून घोडे असे नियोजन झाले आहे. संरक्षक भिंत उभारण्याकरिता मूळ रस्त्याच्या पृष्ठभागाखाली कठीण कातळाचा शोध घेऊन संरक्षक भिंत उभारण्याचे नियोजन झाले असते तर अशा दुर्घटना टळल्या असत्या असे निरीक्षकांचे म्हणणे आहे.
भूकंपप्रवण क्षेत्राचा विचारच नाही
चिपळूण तालुका, शहर परिसर हा भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून शासन दरबारी नोंद आहे. या ठिकाणी होणारी सर्वप्रकारची बांधकामे किमान सात रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाचा चक्का सहन करू शकतील, अशा दर्जाची करणे बंधनकारक आहे. हा नियम शासकीय कामांना देखील लागू आहे. त्यानुसार उंचीच्या मानाने जमिनीखाली किती प्रमाण फूट खोलीपासून बांधकाम करावे याचा विचार संबंधित तंत्रज्ञ व अभियंत्यांनी करणे गरजेचे आहे. मात्र, त्याचा शोध आणि बोध उड्डाणपूल कोसळल्यानंतर तसेच परशुराम घाटात वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांनंतर सुरू झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 16/Dec/2024














