गोगटे जोगळेकर महाविद्यालयात जर्मन भाषा प्रमाणपत्र अभ्यासवर्गाला प्रतिसाद

रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) इंग्रजी विभागाने विद्यार्थ्यांसाठी जर्मन भाषेची ओळख या प्रमाणपत्र अभ्यासवर्गाचा समारोप नुकताच झाला. कला शाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. पीएम उषा या विविध शैक्षणिक उपक्रमांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत योजनेअंतर्गत या अभ्यासवर्गाचे आयोजन केले होते. १५ दिवसांत ३० तासांच्या या वर्गात विविध शाखांतील ३१ विद्यार्थी सहभागी झाले.

या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना रोजच्या व्यवहारात उपयोगी पडेल, असे जर्मन भाषेचे ज्ञान दिले गेले. यामध्ये ऐकणे, वाचणे, बोलणे आणि लिहिणे या कौशल्यांचे प्राथमिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळाले. त्याचबरोबर या अभ्यासवर्गात मार्गदर्शक पूर्वा चुनेकर यांनी जर्मन भाषेसंबंधी विविध अभ्यासक्रम, त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या विविध संधी यावरही मार्गदर्शन केले.

अभ्यास वर्गाचा प्रमाणपत्र वितरण समारंभ झाला. त्यावेळी विद्यार्थ्यांनी जर्मन भाषेत आपला परिचय देऊन अभ्यासवर्गाबद्दल समाधान व आभार व्यक्त केले. मार्गदर्शक पूर्वा चुनेकर यांनी जर्मन व्यक्ती भेटल्यास तिला हे विद्यार्थी आपला परिचय देऊ शकतील व जुजबी संभाषण करू शकतील, असा विश्वास व्यक्त केला. प्रमाणपत्र अभ्यासवर्गाच्या समन्वयक डॉ. यास्मिन आवटे यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. वाणिज्य शाखेत बीबीए पदवी अभ्यासक्रमात चालू होणाऱ्या जर्मन अभ्यास वर्गाचाही लाभ घ्यावा, असे सुचवले.

अध्यक्ष डॉ. चित्रा गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरीच्या दृष्टीने उपयोगी असा अभ्यासवर्ग आयोजित केल्याबद्दल त्यांनी इंग्रजी विभागाचे विशेष कौतुक केले. प्रास्ताविक प्रा. वासुदेव आठल्ये यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रणाली मांजरेकर यांनी केले. इंग्रजी विभागातील डॉ. अतुल पित्रे, प्रा. दत्तात्रय कांबळे, प्रा. भाग्यश्री सावंत उपस्थित होते. अभ्यासवर्गासाठी अवधूत आपटे, अश्विनी तांबे, तेजस्विनी करंबेळकर व ऐश्वर्या करमरकर या जर्मन भाषेतील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले. पूर्वा चुनेकर यांनी मार्गदर्शनासोबतच शैक्षणिक साहित्य उपलब्ध करणे आणि विविध माध्यमातून मूल्यमापन करणे इ. गोष्टींसाठी विशेष सहकार्य केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 16-12-2024