चिपळूण : डीबीजे महाविद्यालयत शिक्षकांसाठी आवाजाची कार्यशाळा

चिपळूण : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा अंतर्गत डीबीजे महाविद्यालय, चिपळूण येथे आवाजाची कार्यशाळा याचे आयोजन करण्यात आले होते.

नवकोकण सोसायटीचे खजिनदार संजीव खरे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रा. सुनिल भादुले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व महाविद्यालयाचे व करिअर कट्टा यांच्या विद्यमाने सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा सादर केला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांचे हस्ते प्रमुख अतिथी यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी करिअर कट्टा व कार्यशाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शितोळे म्हणाले, अनेक वर्षांच्या व्यावसायिक अनुभवाअंती आमच्या असे निदर्शनास आले आहे की जवळजवळ ९०% शिक्षकांना ‘आवाजाचे महत्त्व, त्याचे स्वास्थ्य आणि काळजी तसेच तो टिकवावा कसा’ याविषयी अत्यल्प माहिती असते. अनेक शिक्षकांना आवाजाच्या समस्या भेडसावत असूनही ही केवळ व्यावसायिक अडचण असे मानून त्याकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जाते.

आवाज निर्मितीसाठी लागणाऱ्या स्नायूंचीही अशीच निगराणी राखणे व त्यांची ताकद वाढवणे हे गरजेचे असते, अन्यथा हे यंत्रही भविष्यात आपल्याला त्रास देऊ शकते त्याकरिता ही कार्यशाळा गरजेची आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले.

या कार्यशाळेच्या वक्त्या सोनाली लोहार यांनी सर्व मुद्यांवर प्रकाश टाकणारे एक ऑडिओ- व्हिज्युअल प्रेझेंटेशनही सादर केले. तसेच आवाजा करता काही चांगले व्यायाम प्रकार सादर केले व त्याचे प्रात्यक्षिक करून घेतले. या कार्यशाळेत विविध महाविद्यालयातील ७५ शिक्षक सहभागी झाले होते. प्रा. अस्मिता जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. सुनिल भादुले यांनी आभार व्यक्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 16/Dec/2024