चिपळूणला पुन्हा क्रीडा वैभव मिळवून देऊ : आ. शेखर निकम

चिपळूण : चिपळुणातील क्रीडा क्षेत्राला गती देण्यासाठी आपले सातत्याने प्रयत्न राहतील. पवन तलाव मैदान सुसज्ज करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. प्रेक्षक गॅलरी होत आहे.

अजून खूप काम बाकी आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू यावेत, अशा पद्धतीने आपण हे मैदान उभे करू. निधीची काळजी करू नका. गोवळकोट, उक्ताड, पेठमाप ही मैदानेही सज्ज होत आहेत. पाग येथे छोटे इनडोअर मैदान तयार करण्याचा आपला प्रयत्न असेल. चिपळूणला पुन्हा क्रीडावैभव मिळवून देऊ आणि इथली मुले विविध क्रीडा प्रकारांतून देशाचे नेतृत्व कसे करतील, याकडे लक्ष देऊ, असे आमदार शेखर निकम यांनी सांगितले.

चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने १६ वर्षांखालील शालेयस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते. पवन तलाव मैदान येथे सकाळी ९ वाजता आमदार शेखर निकम यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, माजी नगरसेवक शशिकांत मोदी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, लायन्स क्लबच्या शमिना परकार, अनिरुद्ध निकम, नाना महाडिक, महेश वाजे, जिल्हा बँकेच्या संचालिका दिशा दाभोळकर, समीर काझी, डॉ. राकेश चाळके, उदय उतारी, अभिजीत पाटील, चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर आदी उपस्थित होते.

आमदार शेखर निकम, मुख्याधिकारी विशाल भोसले व अन्य मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचा प्रारंभ झाला. या वेळी प्रास्ताविक करताना अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांनी सलग तीन वर्षे ही स्पर्धा आपण घेत आहोत. शालेय स्तरावरच लेदर बॉलविषयी आवड निर्माण होत असून अनेक शाळा याकडे वळल्या आहेत. गेल्या वर्षी आठ शाळा सहभागी झाल्या होत्या. यंदा उत्स्फूर्तपणे १२ शाळांनी सहभाग नोंदवल्याचे श्री. दाभोळकर यांनी सांगितले. येत्या दोन महिन्यांत राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा असोसिएशनच्या वतीने आयोजित केली जाणार आहे. आमदार शेखर निकम यांच्यासह सर्वांनी या स्पर्धेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. पवन तलाव मैदान सुसज्ज होत आहे, मात्र त्याचा मेंटेनन्स राखणे गरजेचे आहे. न.प. ने है मैदान असोसिएशनच्या ताब्यात द्यावे, आम्ही जीवापेक्षा ते सांभाळू. या ठिकाणी अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणीही दशरथ दाभोळकर यांनी यावेळी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडे केली तसेच त्यांनी सकारात्मक भूमिकेची अपेक्षा मांडली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 16/Dec/2024