संगमेश्वरात २ हजार शेतकऱ्यांचे सौरपंपाचे प्रस्ताव प्रलंबित

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील दोन हजार शेतकऱ्यांचे पीएम कुसूम सौरपंप योजनेचे अर्ज अद्यापही प्रलंबित आहेत. ही चांगली योजना शेतकऱ्यांसाठी उभी राहत असल्याचे सरकारने जाहीर केले; पण प्रत्यक्षात मात्र तिची अंमलबजावणी कासवगतीने सुरू आहे. यामुळे कोकणात शेतीचा प्रश्न गंभीर बनला आहे.

सरकारी यंत्रणांचा ढिसाळ कारभार आणि उदासीनतेचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. शासन दरवर्षी नवीन घोषणा, योजनांचे नवे फलक आणि मोठमोठ्या भाषणांतून शेतकऱ्यांचे भले करण्याचे वचन देते. याच योजनांवर अंमलबजावणीच्या नावाखाली वर्षानुवर्षे कागदोपत्री खेळ सुरू असतो. संगमेश्वर तालुक्यातील शेतकरी आजही या सौर पंपाच्या प्रतीक्षेत आहेत. २ हजार अर्ज प्रलंबित आहेत, म्हणजे या शेतकरी कुटुंबांचे स्वप्न अजूनही साकार व्हायचे आहे.

शेतकऱ्यांच्या समस्यांकडे स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. नवीन योजनांचे उद्घाटन करण्यापूर्वी जुन्या योजनांच्या अंमलबजावणीकडे लक्ष द्यायची गरज आहे. शेतकऱ्यांना तातडीने सौरपंप मिळावेत कोकणातील शेती वाचवायची असेल, तर या शेतकऱ्यांना तातडीने सौरपंप योजना मिळून देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या अर्जाचा तातडीने निपटारा करावा. याबाबत जलदगतीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. सौर पंप योजनेला गती न मिळाल्यास लाभार्थी शेतकरी आक्रमक होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

शेतकरी हा कोकणातील दुर्मिळ समुदाय बनत चालला आहे. संगमेश्वरातील हे शेतकरी अजूनही शेती टिकवून आहेत. या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:51 PM 16/Dec/2024