रत्नागिरी : महागाईच्या झळा पोषण आहाराला

रत्नागिरी : स्वयंपाकी व मदतनीस यांच्या मानधनात १००० रुपये वाढ करण्याचा निर्णव राज्य शासनाने घेतला. मात्र, पूर्वीच्या दरानेच मानधन दिले. तांदळाच्या खिरीचे चार महिन्यांचे पैसे मिळालेले नाहीत. शासनाकडून जाहीर केलेले व दर शनिवारी द्यावयाचे नाचणी सत्त्व अद्याप विद्यार्थ्यांना मिळालेले नाही. विविध पदार्थाच्या किमतीत २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशा विविध समस्या आणि महागाईच्या झळा पोषण आहाराला बसत आहेत.

स्वयंपाकी व मदतनीस यांना केंद्र सरकारकडून ६०० व राज्य सरकारकडून १९०० असे मिळून मासिक २५०० रुपये मानधन दिले जाते. ऑगस्ट २०२४ मध्ये राज्य शासनाने १००० रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र, २५०० रुपयेच मानधन दिल्यामुळे स्वयंपाकी व मदतनीसांमध्ये शासनाने फसवल्याची भावना निर्माण झाली आहे.

ऑगस्टपासून दिवस आठवड्यातून चार तांदळाची खीर तसेच दुसऱ्या व चौथ्या शनिवारी गोड भात देणे बंधनकारक केले आहे. यासाठी लागणारे साखर, दूध, पावडर यासाठी संबंधित ठेकेदाराने पैसे घालावेत, असे सांगितले आहे. एक किलो तांदळामागे ७५० ग्रॅम दूध पावडर व ८०० ग्रॅम साखर असे प्रमाण निश्चित केले आहे. गेले चार महिने ठेकेदार खीर देत आहेत. त्याचे पैसे कधी येणार? ते कोणत्या दराने येणार? याची माहिती शासनाकडून अद्याप दिलेली नाही.

ऑगस्टपासून महिन्यातून दोन वेळा विशेष पोषण आहार अंडी, केळी द्यायला सांगितले आहे. त्यासाठीचे पैसे ठेकेदार घालत आहेत. जून ते सप्टेंबरचेच फक्त मानधन दिले आहे. सोया वडी, साखर, दूध पावडर, अंडी, केळी यासाठी चार महिन्यांचे मानधन खर्च झाले आहे.

इंधन, भाजीपाला अनुदानात वाढ नाही
इंधन, भाजीपाल्यासाठी दि. १५ नोव्हेंबर २०२४ च्या परिपत्रकानुसार पहिली ते पाचवीसाठी २.०८ पैसे व सहावी ते आठवीसाठी ३.११ पैसे दर निश्चित केला आहे. यामध्ये पूरक आहाराचेही पैसे आहेत. लसूण, कांदा, आले, खोबरे, गरम मसाला, चाट मसाला, कोथिंबीर, गॅस, राजगिरा लाडू, शेंगदाणे, चिक्की या सर्व पदार्थांच्या किमतीमध्ये २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्य सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना मात्र सहा महिन्यांची महागाई वाढ झाली म्हणून पगार वाढ देते. मात्र, शालेय पोषण आहार इंधन भाजीपाला अनुदानात मात्र एक पैशाची वाढ केलेली नाही.

नाचणी सत्त्व अडकले कुठे?
ऑगस्टच्या परिपत्रकामध्ये राज्य शासनाकडून दर शनिवारी विद्यार्थ्यांना नाचणी सत्त्व मिळणार, असे नमूद केले आहे. मात्र, चार महिने झाले तरी नाचणी सत्त्व कुठे अडकले हे समजेना. अद्यापही विद्यार्थ्यांना त्याची चवसुद्धा माहीत नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:24 PM 16/Dec/2024