दापोली : दापोलीचा समुद्र किनारा हा इथल्या पर्यटनाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे दापोलीत पर्यटनासाठी येणाऱ्या लाखो पर्यटकांची पहिली पसंती ही समुद्र किनाऱ्याला असते. त्यामुळे समुद्र किनारे हे कायम पर्यटकांनी गजबजलेले असतात. पूर्वी विकेंडला दापोलीचे पर्यटन गजबजलेले दिसायचे; मात्र आता पर्यटकांची कायम वर्दळ दापोलीत असते.
दापोली तालुक्यात चांगली थंडी पडू लागली आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ देखील वाढला आहे. हा ओघ ठिकून राहावा म्हणून आतापासूनच थर्टी फस्ट, नाताळाची तयारी व्यावसायिकांनी सुरू केली आहे. दापोलीत आल्यावर राहण्याची गैरसोय होऊ नये म्हणून आतापासूनच हॉटेल, लॉजचे जोरदार बुकिंग सुरू आहे. दापोलीचा समुद्र किनारा जवळून पाहता यावा म्हणून अनेकांनी बीच लगत असणाऱ्या हॉटेलचे बुकिंगही काही महिने आधीच केले आहे. त्यामुळे सरते वर्ष पर्यटन क्षेत्राला आर्थिक सुबत्ता आणेल असे एकंदरीत दिसत आहे.
दापोलीच्या बीच पर्यटनाबरोबर इथले हर्णे बंदर हे मासळीसाठी प्रसिद्ध आहे. खासकरून अनेक पर्यटक हे इथल्या मासळीची चव घेण्यासाठी येतात. इथले वेगवेगळ्या प्रकारचे मासे पर्यटकांना अधिक आवडतात. पर्यटन वाढले की सुरमई, पापलेट, सरंगा, कोळंबी आदी मासळीला चांगला दर मिळतो. त्यामुळे आर्थिक उलाढाल देखील मोठी होते. या मासळी बरोबर उकडीच्या मोदकांसाठी दापोली परिचित आहे. त्यामुळे अनेक पर्यटक हे या मोदकांची देखील चव चाखतात. हॉटेल, घरगुती खानावळ, अशा सुविधांमुळे पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत नाही.
दापोलीचे पर्यटनक्षेत्र सुंदर आहे. समुद्र किनाराही भूरळ घालतो; मात्र सुविधांचा अभाव आहे. महिलांना समुद्रकिनारी चेंजिंग रूम, बाथरूम अशी व्यवस्था नाही. आम्ही दरवर्षी येतो; पण सुधारणा काहीच नाही. – अंजली लोंचणे, मुंबई
मी दरवर्षी मैत्रिणीं समवेत दापोलीत येते, समुद्रकिनारा सुंदर आहेच; पण इथले उकडीचे मोदक खूप आवडतात. त्यामुळे दापोलीत दरवर्षी यावेसे वाटते. – शालिनी माहेकर, मुंबई
पर्यटन क्षेत्र सुंदर आहे आणि आंजर्ले येथील दीपस्तंभ सुंदर आहे. असं वाटतं येथून जाऊच नये इतके सुंदर पर्यटन क्षेत्र आहे. त्यामुळे आता दरवर्षी आम्ही इथे येऊ. – सीला जीराफे, इंदोर
सर्वाधिक पर्यटक पुण्यातील…
दरवर्षी दापोलीच्या पर्यटनात सर्वाधिक भर घालतात ते पुण्यातील पर्यटक. हे पर्यटक प्रत्येक हंगामात दापोलीत हजेरी लावतात. त्यामुळे पुण्यातील पर्यटकांच्या पसंतीस दापोलीचे पर्यटन उत्तरले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:34 PM 16/Dec/2024














