राजापूर : राजापूर तालुक्यातील अर्धवट कामे एका महिन्यात पूर्ण करा, ही पहिलीच बैठक असल्याने आता विनंती करतोय, पुढच्या आढावा बैठकीपूर्वी काम पूर्ण न झाल्यास कारवाई करणार, असा इशारा आमदार किरण सामंत यांनी अधिकारी वर्गाला दिला.
केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत, राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा आणि पाणीटंचाई यासंदर्भात राजापूर तालुक्याची आढावा बैठक गुरुवारी राजापूर-लांजा-साखरपाचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत पार पडली.
तालुक्यातील विविध गावांतील सध्या सुरू असलेल्या कामांबाबतची माहिती, कार्यकारी अभियंता जि.प. रत्नागिरी आणि गट विकास अधिकारी राजापूर तसेच सरपंच आणि ठेकेदार यांच्याकडून घेतली. आमदार किरण सामंत यांनी गावनिहाय आढावा घेतला. जे जे ठेकेदार हलगर्जीपणा करत आहेत, त्यांना आणि सर्व अधिकारी आणि कामे अर्धवट केलेल्या ठेकेदारांनी ही कामे एक ते दोन महिन्यांत पूर्ण करा, अशी विनंती करतो, असे उद्गार आमदार किरण सामंत यांनी काढले. मात्र, यापुढे विनंती नाही तर थेट कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तालुक्यातील विकासाची कामे करणे ही माझी जबाबदारी आहे. त्यामध्ये पूर्वीप्रमाणे दिरंगाई होताना सहन करणार नाही, त्यामुळे जनतेचे प्रश्न हे माझे प्रश्न आहेत, हे लक्षात ठेवून काम करा.
यावेळी तालुक्यातील गावांचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामसेवक व काम करणारे ठेकेदार यांच्याकडून संबंधित गावातील योजनेच्या कामाची सध्यस्थिती जाणून घेतली तसेच अपूर्ण अवस्थेतील कामे सर्वांना विश्वासात घेऊन पूर्ण करण्याच्या सूचना आमदार सामंत यांनी दिल्या. या बैठकीला कार्यकारी अभियंता मयुरी पाटील, तहसीलदार दिपाली पंडित, गट विकास अधिकारी नीलेश जगताप, जिल्हा नियोजन समिती सदस्य दीपक नागले, भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश गुरव व इतर अधिकारी, कर्मचारी तसेच महायुती घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:48 PM 16/Dec/2024














