गुहागरातील ३०० नौकांवर ट्रान्सपॉन्डर उपकरण बसवणार

गुहागर : मासेमारी करणारे मासेमारीसाठी खोल समुद्रात जात असतात. अनेकदा समुद्रात अचानकपणे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मासेमारांना तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने मासेमारी नौकांवर ट्रान्सपॉन्डर उपकरण बसविण्याच्या कामाचा शुभारंभ गुहागर तालुक्यातील पडवे येथे करण्यात आला. तालुक्यातील ३०० नौकांवर हे उपकरण बसवण्यात येत आहे. पडवे बंदरात लहान-मोठ्या १३० मासेमारी परवाना धारक बोटी आहेत. यापैकी ६ सिलिंडरच्या बोटींवर ट्रान्सपॉन्डर हे उपकरण बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मच्छीमारांना ट्रान्सपॉन्डर हे उपकरण मोफत उपलब्ध होणार आहे. रत्नागिरीत जिल्ह्यासाठी सुमारे दोन हजार ट्रान्सपॉडर्स अपेक्षित आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात सहाशे ट्रान्सपॉन्डर्स मत्स्य विभागास प्राप्त झाले आहेत.

गुहागर कार्यक्षेत्रातील नौकांवर बसविण्यासाठी ३०० ट्रान्सपॉन्डर उपकरण उपलब्ध झाले आहेत. पडवे नंतर इतर बंदरनिहाय नौकांवर ट्रान्सपॉन्डर उपकरण बसविण्याचे काम सुरू करण्यात येईल. हे उपकरण बसविण्यासाठी मच्छीमार संस्था व नौका धारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गुहागर मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी केले आहे.

मदत मिळणे होणार सोपे…
आपत्कालीन परिस्थितीत जसे की, आग लागणे, नौकेचे इंजिन खराब झाल्यास, नौका समुद्रात बुडत असल्यास नौकांवर खलाशांना वैद्यकीय मदत लागल्यास या उपकरणाद्वारे संदेश पाठवता येतो. त्यामुळे मदत मिळण्यास सोपे होते. ट्रान्सपॉन्डर उपकरणामध्ये असलेले आपत्कालीन बटण हे थेट नियंत्रण कक्षाशी संपर्क करते. त्यामुळे नियंत्रण कक्षाला बोटीच्या समुद्रातील स्थळासह अलर्ट प्राप्त होतो व त्यानुसार नौकेवरील नभमित्र अॅपव्दारे नियंत्रण कक्षाकडून संदेश प्राप्त होतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:04 PM 16/Dec/2024