पावस : दिवसेंदिवस थंडीचे प्रमाण वाढू लागल्याने पावस परिसरामध्ये हापूस आंबा कलमांना मोहोर येऊ लागला आहे. यामुळे बागातदारांमध्ये समाधानाची बाब दिसून येत असून, फवारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
पूर्वी या परिसरामध्ये हापूस आंबा कलमांना उशिरा मोहोर येत असल्याने गुढीपाडव्याला आंब्याचा मुहूर्त केला जायचा; परंतु सध्याच्या काळामध्ये दिवसेंदिवस वातावरणामध्ये होत असलेला बदल आणि खताचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने हापूस आंब्याचा हंगाम लवकर येत आहे. यावर्षी सुरुवातीला थंडीचे प्रमाण चांगल्या प्रकारे सुरू झाले होते. त्यादरम्यान अनेक झाडांना पालवी येण्यास सुरुवात झाली होती परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये थंडी गायब झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती. त्यामुळे बागातदार चिंताग्रस्त झाले होते.
आता थंडीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे अनेक भागांमध्ये हापूस आंब्याच्या कलमांना चांगल्या प्रकारे मोहर येण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिक कामगार मजुरीसाठी मिळत नसल्याने गुरख्यांना येथे आंबा बागेत देखरेख व अन्य कामांसाठी ठेवले जाते. या परिसरात गुरखे दाखल होत असून, बागायतदार त्यांना आपल्या बागेत नेण्यासाठी एसटी स्टॅण्डवर येत आहेत.
सध्या थंडीचे प्रमाण चांगल्या प्रकारे असल्याने आंबा कलमे मोहरू लागली आहेत. हा मोहोर टिकवण्यासाठी फवारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. – आशुतोष अभ्यंकर आंबा व्यावसायिक, पावस
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:11 PM 16/Dec/2024














