खेड : डाक बंगला परिसरात बिबट्याचे दर्शन

खेड : शहरातील डाक बंगला परिसरात दि. १४ रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीला बिबट्या दिसला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. वन विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, वन कर्मचारी यांनी घटनास्थळी पाहणी करून नागरिकांना खबरदारीच्या सूचना केल्या आहेत.

खेड शहरातील डाक बंगला परिसरात राहणारे साजिद रावल हे शनिवारी दि.१४ रोजी पहाटे ५.३० वाजता नमाजाला जात असताना त्यांना बिबट्या दिसून आला. जवळच रानटी डुक्कर देखील होते. या घटनेची माहिती त्यांनी जवळपासच्या ग्रामस्थांना दिली. तसेच सोशल मीडियावरही ही माहिती तत्काळ पसरली. याबाबत वनाधिकारी सुरेश उपरे यांनी गंभीर दखल घेत तातडीने वनरक्षक डोईफोडे व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर बिबट्या भक्ष्याच्या शोधात तेथे आला असावा; मात्र माणसांची चाहूल लागताच बिबट्याने नंतर पलायन केले असावे, असा अंदाज व्यक्त केला आहे.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिकांना खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. या घटनेवर वनविभाग लक्ष ठेवून आहे. परंतु गेल्या काही वर्षात दुर्गम भागात दिसणारा बिबट्या आता शहरात अथवा दाट लोकवस्तीच्या भागात दिसू लागल्याने ही बाब गंभीर मानली जात आहे. बेसुमार जंगलतोड व शिकार यामुळे बिबट्यांचा अधिवास उद्ध्वस्त होत असून, भक्षाच्या शोधार्थ त्यांना दूरदूर भटकावे लागत आहे. यातूनच ते मानवी वस्तीनजीक आल्याचे यावरून सिद्ध होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:30 PM 16/Dec/2024