दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख मासेमारी बंदर म्हणून ओळखल्या जाणार्या हर्णै बंदरामधून दापोली पोलिसांनी एका मासेमारी नौकेतून अवैधरीत्या विक्री करण्यासाठी आणलेले सुमारे 30 हजार लिटर डिझेल सद़ृश द्रवपदार्थ या नौकेसह जप्त केला आहे. या मुद्देमालाची किंमत सुमारे 47 लाख 62 हजार 500 रुपये असल्याची माहिती दापोली पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी संशयित 5 जणांविरोधात विनापरवाना डीझेलसारख्या जीवनावश्यक व ज्वालाग्राही पदार्थाची धोकादायकरित्या हाताळणी, साठवणूक व वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
संशयित वामन पोशिराम रघुवीर, (37) रा. हर्णै, हातीन केसरीनाथ कोळी (34) व दर्शन अनंत कोळी, (35) दोन्ही रा. बोडणी, रेवस ता. अलिबाग, संदीपकुमार मिठाईलाल मिसाद, (32) व शिव्य प्रमोद मिसाद (19) रा. झापराबाद, जोनपूर (उत्तरप्रदेश) अशी त्यांची नावे आहेत.
या बाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्णै बंदर येथे एका मासेमारी नौकेतून बेकायदा विक्री करण्यासाठी डीझेल सदृश्य द्रवपदार्थ आणला असल्याची माहिती दापोली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 15 रोजी सायंकाळी 5 वाजता हर्णै बंदर येथे पोलिसांनी पथकासह धाव घेतली. तेथे त्यांना ‘सुफी’ नावाची एमएच 7 एमएमएम 288 हा क्रमांक असलेली एक मासेमारी नौका आढळून आली. या नौकेची तपासणी केली असता नौकेच्या 14 खणांमध्ये सुमारे 30 हजार लिटर डीझेल सदृश्य द्रवपदार्थ आढळून आले. याच नौकेवर हा द्रवपदार्थ काढण्यासाठी एक सक्शन पंपही त्यांना आढळून आला.
संशयित यांच्याविरोधात विनापरवाना डीझेलसारख्या जीवनावश्यक व ज्वालाग्राही पदार्थाची कोणतीही योग्य ती खबरदारी न घेता मानवी जीवितास धोका उत्पन्न होईल, अशा रीतीने हाताळणी, साठवणूक व वाहतूक केल्याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही तक्रार उपनिरीक्षक दत्ता पवार यांनी दापोली पोलीस ठाण्यात दाखल केलीे.
या कारवाईत पोलिस उपअधीक्षक आवटी, पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, उपनिरीक्षक राजकुमार यादव, दत्ता पवार, हेड काँ. सडकर, पंकज पवार, विकास पवार, सुहास पाटील, सुरज मोरे सहभागी झाले होते.
या प्रकरणी सर्व संशयितांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 287,3 (5) सह अत्यावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे करत आहेत. दापोली पोलिसांच्या या कारवाईमुळे हर्णै परिसरात खळबळ उडाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 17-12-2024














