रत्नागिरी : जयगडमधील जेएसडब्ल्यू पोर्ट भागातील एलपीजी फॅसिलिटी युनिटमधून वायू गळतीची घटना झाली होती. याबाबतच्या चौकशीसाठी सोमवारी चौकशी समितीने जिंदल कंपनीच्या पोर्ट विभागात जाऊन पाहणी करून माहिती घेतली.
जिंदल पोर्ट भागात चार दिवसांपूर्वी वायुगळतीमुळे नजीक असणार्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जयगडच्या विद्यार्थ्यांना त्रास झाला होता. शाळेतील 70 विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर माजी पालकमंत्री व स्थानिक आमदार उदय सामंत यांनी कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार झाल्याचा ठपका ठेवला होता. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती नेमण्यात आली होती.
अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली आणि समितीचे सदस्य सचिव प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या नेतृत्वाखाली समितीने कामकाज सुरु केले असून, सोमवारी या समितीने जयगड येथे सर्व समिती सदस्यांची बैठक घेतली. यात बंदर अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, प्रदूषण विभागाचे अधिकारी, पाच ग्रामस्थ यांचा समावेश होता. या पथकाने जिंदलच्या एलपीजी फॅसिलिटी प्लांटला भेट देत जागेची पाहणी केली. त्यानंतर एलपीजी ज्या ठिकाणाहून टँकरमध्ये भरला जातो. त्या भागाची पाहणी केली. एलपीजी टँकरचे टर्मिनल असणार्या ठिकाणी जाऊनही पथकाने पाहणी केली व माहिती घेतली. त्यानंतर शाळेची बाहेरुन पाहणी केली असून, शाळा सुरु असताना ही समिती शाळेत जाऊन पुन्हा पाहणी करणार आहे.
कंपनीकडून राबवल्या गेलेल्या सुरक्षेच्या उपक्रमांची पाहणी करतानाच, या कंपनीला उपाययोजनाही सूचवल्या जाणार आहेत. लवकरच या बाबतचा अहवाल तयार होईल, असे समितीच्या पदाधिकार्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 17-12-2024














