चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या प्रस्तावित वाढीव घरपट्टी विरोधात नागरिकांमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणानंतर अनेक नागरिकांच्या घरपट्टी कित्येक पटीने वाढल्या आहेत. त्यामुळे अचानक भलीमोठी वाढ सोसायची कशी, या विरोधात नागरिक मंगळवारी (दि. १७) सकाळी ११ वा. न.प. वर धडकणार आहेत.
या संदर्भात सोमवारी सकाळी सावरकर सभागृहात शहरातील व्यापारी व नागरिकांची बैठक झाली. या बैठकीत अनेक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी नवीन घरपट्टी वाढीबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली व या वाढीव घरपट्टीचा निषेध केला. न. प. प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने घरपट्टी आकारली आहे. त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत.
या संदर्भात पालिकेच्या प्रशासनाला धारेवर धरण्यात येणार आहे. व्यापारी महासंघटनेच्या नेतृत्वाखाली नागरिक मंगळवारी सकाळी ११ वा. चिपळूण न.प. समोर एकवटणार आहेत. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मुख्याधिकारी विशाल भोसले यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच आ. शेखर निकम, आ. उदय सामंत, जिल्हाधिकारी यांना देखील हे निवेदन पाठविले जाणार आहे. नागरिकांनी वाढीव घरपट्टीबाबत तातडीने न.प.कडे आक्षेप नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 17/Dec/2024














