राजापूर : जैतापूर क्रमांक एक जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळेमध्ये दोन शिक्षक दिल्याने सोमवारपासून दोन दिवसांसाठी पुकारण्यात आलेले शाळा बंद आंदोलन पालकांनी मागे घेतले आहे.
शाळेत एक पूर्ण वेळ शिक्षक आणि एक सहाय्यक शिक्षक आवश्यक असताना गेल्या अनेक महिन्यांपासून केवळ एक कामगिरीवरील शिक्षक अदलून बदलून दिले जात आहेत. त्याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे वारंवार विनंती करूनदेखील या शाळेला शिक्षक मिळालेले नव्हते. त्यामुळे पालक तसेच जैतापूरच्या सरपंचांनी प्रत्यक्ष भेटून विनंतीदेखील केली होती. चार-पाच दिवसांत दोन शिक्षक देतो, असे तोंडी सांगितलेदेखील होते. मात्र, ते दोन शिक्षक शाळेत रुजू झाले नव्हते. कामगिरीवरील वारंवार बदलून येणाऱ्या शिक्षकांमुळे पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने तसेच वारंवार विनंतीकरूनदेखील पंचायत समिती दुर्लक्ष करीत असल्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी आणि पालकांनी आजपासून दोन दिवसांच्या शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. मुलांना शाळेत न पाठवता शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर राहून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याचे निवेदन गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले होते त्याची प्रत सरपंच आणि गटविकास अधिकारी तसेत आमदार किरण सामंत यांनाही देण्यात आले होते. शाळेला दोन शिक्षक देण्याचे पत्र मिळाल्यास आंदोलनाचा फेरविचार करू, असेही पत्रात म्हटले होते. त्या पत्राची दखल घेऊन कायमस्वरूपी दोन शिक्षकांची नेमणूक होईपर्यंत दोन कामगिरीवरील शिक्षक देण्याचा तोडगा काढण्यात आला आहे. त्यानुसार दोन शिक्षक आज शाळेत रुजू झाले. त्यामुळे पालकांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
जैतापूरचे सरपंच राजप्रसाद राऊत, व्यवस्थापन समिती अध्यक्षा स्वरांजली करगुटकर, शिक्षण प्रेमी सदस्य आणि माजी अध्यक्ष राकेश दांडेकर, पालक परेश मांजरेकर, प्रीतेश देवळेकर, अमित पडवळ, शुभांगी आखाडे, प्रदीप घाडी, दीपिका करगुटकर, दीक्षा भिवंदे, पूर्वा पवार, पूर्वा भुते, स्वाती लाड, समृद्धी तिर्लोटकर, सानिका लाड, गजानन मांजरेकर यांनी आंदोलनासाठी पुढाकार घेतला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 17-12-2024














