परभणी घटनेतील मास्टर माइंडचा शोध घ्यावा; रत्नागिरी भारतीय बौद्ध महासभेचे पोलिस अधीक्षकांमार्फत ‘आयजीं’ना निवेदन

रत्नागिरी : परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रतिकृती प्रत ठेवण्यात आली होती. एका माथेफिरुने संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना केल्याच्या घटनेनंतर परभणी शहरासह राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहे. याच घटनेचा निषेध सोशल मीडियासह रस्त्यावर उतरून आंबेडकरी अनुयायांकडून संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने 16 डिसेंबर रोजी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांतर्फे आणि पोलिस अधीक्षकांतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याच्या पोलीस महासंचालकांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, परभणी येथे 10 डिसेंबर 2024 रोजी देशद्रोही समाज कंटकाने भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली आहे. भारतीय संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना करणार्‍या देशद्रोही समाज कंटकांवर भारतीय संहितेच्या देशद्रोही कायद्यानुसार कठोर कारवाई करावी आणि सीबीआय चौकशी करून यातील मास्टर माइंडचा शोध घेण्यात यावा, असे निवेदनात म्हटले आहे.

या प्रकरणी संबंधितांवर कारवाई न झाल्यास जिल्ह्यातील बौद्ध समाज व संविधानप्रेमी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, अशा इशाराही देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 17/Dec/2024