रत्नागिरी : 3 महिने उपचार करून जखमी अजगराला सोडले नैसर्गिक अधिवासात

रत्नागिरी : शहराजवळील मिऱ्या बंदर येथे जाळ्यामध्ये अडकून गंभीर जखमी अवस्थेत अजगर साप सापडला होता.

उपचारासाठी त्याला पुणे रेस्क्यू टीमने नेले होते. तीन महिने उपचार करून तंदुरुस्त अजगरला दोन दिवसांपूर्वी रत्नागिरीत आणून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. रत्नागिरी परिक्षेत्र वनविभागाने ही कामगिरी केली.

रत्नागिरी येथील मिऱ्या बंदर समुद्रकिनारी अजगर जाळ्यात अडकल्याची माहिती रत्नागिरी परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांना मिळाली होती. त्यांनी जाळ्यात अडकलेल्या अजगराची शहीद तांबोळी व वनरक्षक रत्नागिरी प्रभू साबणे यांच्या मदतीने सुटका केली. अजगर ताब्यात घेतला. त्यानंतर रत्नागिरी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. काळगे यांना दाखविला. त्यांनी त्याच्यावर प्रथमोपचार केले. अजगर गंभीर जखमी झाला होता. पशुवैद्यकीय अधिकारी व विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड यांनी दिलेल्या सूचनेनुसार, पुढील उपचारासाठी अजगराला पुणे येथील रेस्क्यू सेंटर या ठिकाणी पाठवण्याच्या सूचना केल्या. अजगराला १९ ऑक्टोबरला पुणे रेस्क्यू टीम यांच्याकडे उपचार करण्यासाठी पाठवण्यात आले. तब्बल तीन महिने उपचार करून अजगर तंदुरुस्त झाले. त्यानंतर पुणे रेस्क्यू टीमने रत्नागिरीचे परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांना माहिती दिली व अजगर १२ डिसेंबरला रत्नागिरीत आणण्यात आला. रत्नागिरी कार्यक्षेत्रामधील पाण्याच्या ठिकाणी अजगराला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. या वेळी रत्नागिरी परिक्षेत्राचे वनाधिकारी प्रकाश सुतार, रत्नागिरी वनपाल गावडे, वनरक्षक प्रभू साबणे, वनमजूर हरी गुरव, वन्यप्राणी मित्र शाहीद तांबोळी, अनिकेत मोरे, महेश धोत्रे आदी उपस्थित होते.

संपर्कासाठी वनविभागाचे आवाहन
आपल्या परिसरात कुठलाही वन्यप्राणी, पशुपक्षी अडचणीत सापडला असेल तर वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी वनविभागाच्यावतीने विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 17-12-2024