खेड : तालुक्यातील धामणंद मुलांडावाडी येथील बीएसएनएल टॉवरवरून गेल्या २० दिवसांपासून रेंजच गायब झाली आहे. त्यामुळे येथील ग्राहक आउट ऑफ कव्हरेज झालेले आहेत. या समस्येवर संबंधित प्रशासनाकडून अद्यापही कोणतीच उपाययोजना केली गेलेली नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.
धामणंद हा परिसर बीएसएनएलने जोडला गेला आहे. या परिसरात खासगी मोबाईल सेवा नसल्याने ग्राहकांची सर्वच मदार बीएसएनएल सेवेवर आहे; मात्र गेल्या २० दिवसांहून अधिक सेवा कोलमडून पडली असल्याने या परिसरात संपर्क साधण्यात मोठ्या अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. या परिसरात अनेकजण भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत. तेही आपल्या कुटुंबाशी संपर्क साधत असतात. त्यांनादेखील आऊट ऑफ कव्हरेजचा सामना करावा लागत असून, या परिसरात टॉवर कार्यान्वित झाल्यापासून ही समस्या कायम आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. विद्युतपुरवठा खंडित झाल्यास इथे या टॉवरला डिझेल जनरेटर किंवा बॅटरीची व्यवस्थाही नसल्याची बाब उघड झाली आहे. या टॉवरची कार्यकक्षा मुसाड, कुंभवली, धामणंद, मुलांडावाडी, मुसाडपेठ, कुरवळ जावळी, कुरवळ खेड, निंबारावाडी कुंभारवाडा, वावे, पोसरे आदी गावे आहेत. या गावातील बीएसएनएलची सेवा घेतलेले ग्राहक आउट ऑफ कव्हरेज झाले आहेत. याबाबत माजी सैनिक बाळकृष्ण श्रीरंग सुर्वे, मुसाड यांनी संबंधित यंत्रणा तसेच वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून सेवा सुधारण्यासाठी विनंती केली होती. याची दखल यंत्रणांनी घेतलेली नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 17/Dec/2024














