गुहागर : गुहागर हे कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून विकसित होत आहे. तालुक्याला लाभलेल्या अथांग समुद्र चौपाटीमुळे आज पर्यटक गुहागरात मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. अशा वेळी पर्यटकांना समुद्र चौपाटीवरून बाहेर काढणे हा प्रकार गुहागर पोलिसांनी थांबवावा. सूर्यास्त झाल्यानंतर समुद्राच्या पाण्यात कोणीही जाऊ नये हे योग्य आहे; परंतु वाळूमध्ये थांबण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. पर्यटनावर गुहागर तालुक्याची इकॉनॉमी अवलंबून आहे. पुढील सहा महिने पर्यटनासाठी पोषक आहेत. याला पोलिस प्रशासनानेही सहकार्य करणे आवश्यक आहे. पर्यटकांना चौपाटीवरून बाहेर काढणे हे योग्य नाही. अन्यथा, वेगळा मार्ग तालुकावासीयांना अवलंबावा लागेल, असा इशारा माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे.
गुहागरला पर्यटन व त्यादृष्टीने येथील निसर्गसौंदर्यामुळे येथे होत असलेले विविध चित्रपटांचे चित्रीकरण ही जमेची बाजू आहे. गुहागर तालुक्याचे अर्थकारण वाढवणारे, येथील जनतेला विविध मार्गांनी व्यवसायाला चालना देणारे हे उपक्रम कायम व्हावेत. यामुळे याला कोणी विरोध करत असेल तर गुहागरातील जनतेने याला योग्यवेळी उत्तर देऊन या अडथळा आणणाऱ्यांना योग्य जागा दाखविली पाहिजे.
डॉ. नातू म्हणाले, गुहागर-अंजनवेल व गुहागर-वेलदूर हा मार्ग सार्वजनिक बांधकामाच्या मालकीचा आहे. रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाची जागा वेगळी आहे. त्याला संरक्षण आहे; मग अंजनवेल मुख्य मार्गावर होत असलेले चित्रीकरण रोखण्याचा कंपनीच्या सीआयएसएफला कोणताही अधिकार नाही. हा रस्ता त्यांच्या मालकीचा नाही. यापुढे कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही. सीआयएसएफच्या या कृत्याबाबत डॉ. नातू यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 17/Dec/2024














