लांजा : तालुक्यातील साटवली विभागातील बागायतदारांना आंबा-काजू विम्याचा परतावा मिळालेला नाही. हवामानातील बदलामुळे बागायतदारांचे नुकसान होऊनही ही परिस्थिती ओढवल्यामुळे मोठा फटका बसलेला असून, त्याबाबत सरकारदरबारी व्यथा मांडावी, अशी मागणी आमदार किरण सामंत यांच्याकडे साटवली येथील शेतकऱ्यांनी केली.
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण ऊर्फ भैय्या सामंत यांनी लांजा येथील रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाला भेट दिली. यावेळी बँकेचे संचालक महेश ऊर्फ मुन्ना खामकर यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी मधुकर टिळेकर, रामभाऊ गराटे, बँकेचे सहा. सरव्यवस्थापक प्रकाश जाधव आदी अधिकारी व कर्मचारी तसेच संस्थाध्यक्ष विजय वाटोळे, अल्ताफ काझी, राघो भितले, कमलाकर यशवंतराव यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. यावेळी हवामान केंद्रामधील त्रुटीमुळे साटवली विभागातील शेतकऱ्यांना यावधींचा आंबा-काजू विम्याचा लाभ मिळालेला नाही. ट्रीगर अॅक्टिव्ह झाला नसल्याचे कारण देण्यात आले आहे तसेच २०२४- २५च्या आर्थिक वर्षात बँकेकडे थकीत असणाऱ्या संस्थांना मध्यम व दीर्घ मुदत बिगरशेती कर्जाबाबत बँकस्तरावरून उपाययोजना करणे आवश्यक आहे. विकाससंस्थांना स्वतःचे कार्यालय बांधण्यासाठी सरकारकडून मदत मिळावी त्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी आमदार सामंत यांच्याकडे केली. सचिवांना शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करण्याबाबत प्रयत्न करण्याचीही मागणी केली गेली. याबाबत सरकारदरबारी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन आमदार सामंत यांनी दिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 17/Dec/2024














