चिपळूण, खेड, रत्नागिरीला आज ‘महावितरण’ची लोकअदालत

रत्नागिरी : चिपळूण, खेड आणि रत्नागिरी विभागातील महावितरणच्या ग्राहकांकरिता आज, शनिवारी (दि. २८ सप्टेंबर) लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. वीज ग्राहकांनी त्य़ात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

थकीत वीजबिल, वीज चोरी आदी कारणांनी महावितरणमार्फत कोर्टात दाखल झालेल्या व होऊ शकणाऱ्या केसेस सन्मानाने आणि सामोपचाराने सोडवण्याची संधी वीजग्राहकांना उपलब्ध झाली आहे. येत्या शनिवारी जिल्ह्यातील विविध न्यायालयांत लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील ४४७६ वीजग्राहकांना या लोकअदालतीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वीज ग्राहकांनी महावितरणला मूळ मुद्दल व दंड भरणे हे वीज गरजेचे आहे. मात्र जे ग्राहक ही रक्कम जमा करत नाहीत, त्यांच्यावर महावितरणकडून कायदेशीर कारवाई केली जाते. सध्या जिल्ह्यात अशा ४४७६ वीजग्राहकांकडून थकीत वीज बिल, वीजचोरी आणि त्यावरील दंड असा सुमारे ३ कोटी ६३ लाख रुपयांचा कायदेशीर भरणा अपेक्षित आहे. त्यामध्ये महावितरणच्या चिपळूण विभागातील ९६१ ग्राहकांकडून ५० लाख, खेड विभागातील ६२२ ग्राहकांकडून ७४ लाख तर रत्नागिरी विभागातील २८९३ ग्राहकांकडून २ कोटी ३९ लाख या रकमेचा समावेश होतो.

सर्व सबंधित ग्राहकांना महावितरणकडून लोकअदालतीबाबतची नोटीस पाठवण्यात आली आहे. वीज ग्राहकांनी त्यांच्या केससंदर्भातील संबंधित कोर्टात शनिवारी आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 28-09-2024