राजापूर : स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि भोपाळ जलतरण असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भोपाळ येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत राजापूरची स्नेहा रहाटे हिने २०० मीटर फ्री स्टाईल प्रकारामध्ये कास्यपदक आणि ४०० मीटर फ्री स्टाईलमध्ये रौप्यपदक अशी दोन पदके पटकावत दुहेरी यश संपादन केले. या यशादल तिचा दिशा परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.
दिशा परिवाराच्यावतीने केलेल्या या सत्कारप्रसंगी प्रा. जी. आर. कुलकर्णी राजापूर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संदीप मालपेकर, सतीश रहाटे, श्रुती ताम्हणकर, स्नेहाची आई सुप्रिया रहाटे, दिशा परिवारचे गजानन जोशी, अनंत रानडे, बी. के. गोडाळ, राजापूर हायस्कूलचे शिक्षक अभिजित घागरे, भारत जानकर, सुगंधा रानडे आदी उपस्थित होते.
शहरातील राजापूर हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने मुंबई विद्यापिठातून एमएबी पीएड् पूर्ण केले. कराटे प्रशिक्षणमध्ये ब्लॅक बेल्ट डिग्री प्राप्त केली आहे. राजापूर येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेत असताना नवव्या वर्षी राजापूर येथील मारुती मंदिर तलावात ए. जी. भावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहण्याचे प्रशिक्षण सुरू केले, सध्या ती विनायक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. यापूर्वी तिने केरळ, कर्नाटक, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, मालवण, हैद्राबाद येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भाग घेत अनेकवेळा कास्यपदके, रजतपदके व सुवर्णपदके पटकावली आहेत. भोपाळ येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होताना तिने दुहेरी यश संपादन केले आहे. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
दिशा परिवाराची सामाजिक बांधिलकी
सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण घेता यावे म्हणून पुणे येथील दिशा परिवारातर्फे लाखो रुपयांची शिष्यवृत्ती देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. दिशा परिवारातर्फे तालुक्यातील अनेक गरजू मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्तीही दिली आहे. भोपाळ येथील राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागासाठी स्नेहा हिला दहा हजारांची आर्थिक मदतही दिली होती. या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 PM 17/Dec/2024














