रत्नागिरी : स्वगृही संस्थेतर्फे केळ्ये येथील वृद्धसंकुलाची २० तारखेला उभारणी

रत्नागिरी : शिरगाव (ता. रत्नागिरी) येथील स्वगृही सेवा संस्थेतर्फे केळ्ये (ता. रत्नागिरी) येथे सर्व सोयींनी युक्त वृद्धसंकुलाची उभारणी येत्या २० तारखेपासून सुरू होणार आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा वीणा लेले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात ही पत्रकार परिषद झाली. स्वगृही संस्था शिरगाव येथे गेली आठ वर्षे वृद्धांसाठी कार्यरत आहे. संस्थेने आपला विस्तार करायचे ठरवले असून, त्यासाठी केळ्ये येथे १६० वृद्ध राहण्याची क्षमता असणारे सर्व सोयींनी युक्त वृद्धसंकुल बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. वृद्धाश्रम बांधण्याचा नियोजित खर्च ८ कोटींच्या घरात असून, त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

याबाबत अधिक माहिती देताना श्रीमती लेले म्हणाल्या, सध्या शिरगाव येथे १९ वृद्धांची सोय होईल असा वृद्धाश्रम सुरू आहे. संस्थेचे नऊ लोकांचे विश्वस्त मंडळ असून सध्या १३ कर्मचारी येथे कार्यरत आहेत. आतापर्यंत सुमारे २०० वृद्धांनी या सेवेचा लाभ घेतला आहे; मात्र वृद्धाश्रमाची वाढती गरज लक्षात घेऊन केळ्ये येथे १६० वृद्ध राहतील असे वृद्ध संकुल बांधण्याचा पहिला प्रकल्प सुरू करत आहे. त्यासाठी संस्थेने ९ एकर २८ गुंठे जागा खरेदी केली असून, या ठिकाणी सर्व सुविधांनी सुसज्ज अशा ४० खोल्या, ४ सामायिक खोल्या, स्वतंत्र स्वयंपाकघर, भोजनालय, लिफ्ट आणि जिने, कार्यालय, भेटकक्ष, विरंगुळा कक्ष यांचा समावेश असेल. या ठिकाणी चालत्या फिरत्या वृद्धांसह अंथरुणाला खिळलेले, निराधार तात्पुरते व कायमस्वरूपी राहणाऱ्या वृद्धांची सोय केली जाणार आहे.

वृद्धांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक भिंत, सौरऊर्जा प्रकल्प, फळे भाजीपाला वृक्ष लागवड, प्रार्थना व योग स्थळ, महाराष्ट्र व इंडियन नर्सिंग कौन्सिलशी संलग्न पोस्ट सर्टिफिकेट जेरिएट्रिक नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करणे, स्थानिक आजी-आजोबांसाठी दिवसभरात एकत्र येऊन रात्री आपापल्या घरी जातील असे डे केअर सेंटर, मतिमंद आणि गतिमंद यांची निवासव्यवस्था, स्मृतिभ्रंश (अल्झायमर) झालेल्या वृद्धांची निवासी व्यवस्था आदी प्रकल्प भविष्यात टप्प्याटप्प्याने राबविले जाणार आहेत, असे श्रीमती लेले यांनी सांगितले.

वृद्धांची गरज ओळखून सुरू करत असलेल्या या प्रकल्पाला आर्थिक पाठबळाची आवश्यकता असून समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे आणि आर्थिक देणगी किंवा इमारतीच्या बांधकामासाठी उपयुक्त कोणत्याही प्रकारचे पायाभूत साहित्य देऊन पाठिंबा द्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी श्रीमती लेले (९९७०३२७२८९) आणि कार्यवाह ओंकार मुळ्ये (९४२०४५८८७८) यांच्याशी संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 17-12-2024