चिपळूणच्या वाढीव घरपट्टीबाबत फेरसर्वेक्षण : मुख्याधिकारी विशाल भोसले

चिपळूण : चिपळूण शहरातील वाढीव घरपट्टीबाबत अर्ज करणाऱ्या नागरिकांच्या घरांचे परत सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिली.

चिपळूण पालिकेने आपल्या हद्दीमधील सर्व मिळकतीची पाहणी करून सुधारित वार्षिक करयोग्य मूल्याची यादी तयार केली आहे. शहरात एकूण सुमारे ३२ हजार मालमत्ताधारक आहेत. त्यामध्ये साडेचार हजार नवीन मालमत्ताधारक तयार झाले आहेत. शहरातील सर्व मालमत्ताधारकांचे सर्वेक्षण करून सर्व मालमत्ता कागदावर आणले आहेत. मात्र, काहींना चुकीच्या पद्धतीने घरपट्टी लादल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याविरोधात आज उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन फेरसर्वेक्षणाची मागणी केली.यावेळी शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे, शहरप्रमुख शशिकांत मोदी, महिला शहर संघटक वैशाली शिंदे, युवा शहर संघटक पार्थ जागुष्टे, प्रशांत मुळे, सर्व उपशहरप्रमुख, विभागप्रमुख आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अनेक मुद्दयांवर चर्चा करण्यात आली. ज्या नागरिकांना घरपट्टी वाढली, असे म्हणणे असेल त्यांनी २८ डिसेंबरपर्यंत पालिकेत अर्ज करावेत. ज्यांचा अर्ज येईल त्यांचे पुन्हा सर्वेक्षण केले जाईल. त्यानंतरच घरपट्टी आकारली जाईल. या वेळेत कोणताही दंड लागणार नाही, असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 17-12-2024