कोंढेतडवासीयांना देणार शुद्ध पाणी : गटविकास अधिकारी नीलेश जगताप

राजापूर : शहरानजीकच्या कोंढेतड येथील ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावासाठी राबवण्यात आलेल्या नळपाणी योजनेद्वारे नदीतील पाणीपुरवठा केला जात आहे. नदीतील दूषित आणि गढूळ पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांकडून वर्तवली जात आहे.

याबाबत गटविकास अधिकारी नीलेश जगताप यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाणीपुरवठ्याची पाहणी केली आणि कोंढेतडवासीयांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याची ग्वाही दिली. भाजप युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष अरविंद लांजेकर यांनी पंचायत समितीमध्ये झालेल्या आढावा बैठकीत याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. कोंढेतडला पाणीपुरवठा होत असलेल्या अर्जुना नदीपात्राची जगताप यांनी पाहणी केली. यावेळी अरविंद लांजेकर, ग्रामस्थ सुभाष नवाळे, आशिष वारंगे, ग्रामसेवक निशांत रायकर आदी उपस्थित होते.

शहरानजीकच्या कोंढेतड ग्रामपंचायतीतर्फे ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून नळपाणी योजना राबवण्यात आली आहे. या योजनेतून पाणीपुरवठा करत असताना मागील दोन वर्षे या नळपाणी योजनेतील विहिरीतील पाणी एप्रिल, मे महिन्यात कमी होत असल्याने टंचाईचा सामना करावा लागत होता. त्यामुळे यावर उपाय म्हणून टंचाईकाळात अर्जुना नदीतील पाणी या विहिरीत सोडून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

केवळ एक ते दोन महिनेच नदीतील पाणी विहिरीत सोडून ते ग्रामस्थांना पुरवण्याबाबत नियोजन केलेले असताना नदीतील पाणी विहिरीत सोडून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे. अर्जुना नदीमध्ये गुरे धुणे, झाडांना औषध फवारणीसाठी पाणी वापरणे असे प्रकार सुरू असून, त्यातून पाणी दूषित होते. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. याकडे माजी उपसरपंच लांजेकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 17/Dec/2024