अंड्यांची दरवाढ

संगमेश्वर : महागाईची झळ अंड्यांनाही बसली असून किरकोळ बाजारात ६ रुपयाला एक मिळणारे अंडी ८ रुपयांनी विकले जात आहे तर ७२ रुपये डझन मिळणारी अंडी आता ९६ रुपयांनी विकली जात आहेत. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे टपरीवर मिळणाऱ्या अंड्यांचे पदार्थही महागणार आहेत. त्याचा फटका सामान्यांना बसणार आहे.

महागाई दिवसेंदिवस गगनाला भिडत चालली आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसलेली आहे. जीवनावश्यक सर्वच वस्तूंवर महागाईच्या झळा बसत आहेत. त्यातून अंडीही चुकलेली नाहीत. सध्या बाजारात अंडी ही भाव खात आहेत. तरीही अंडी खाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मागणी वाढल्यामुळे थंडीच्या दिवसात अंड्याचे दरही गगनाला भिडले आहेत. काही दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात ६ रुपयाला एक तर ७२ रुपये डझनाने मिळणारी अंडी आता ८ रुपयाला एक तर ९६ रुपये डझनाप्रमाणे विकली जात आहे. भाववाढ झाली असली तरी अंडी खाणारे शौकीन मोठ्या प्रमाणात अंडी खरेदी करत असल्याचे सर्वत्र पाहावयास मिळत आहे. अंड्यांच्या किमतीत हिवाळ्यापूर्वीच यंदा एक रुपयाने वाढ झाली होती. गेल्या वर्षी पाच ते सहा रुपये नग मिळणारे अंडे गेल्या महिन्यात सात रुपयांना मिळत होते. आता हेच अंडे आठ रुपयांना झाले आहे.

कोंबड्यांचे खाद्य महागल्यानेदेखील अंड्यांचे भाव वाढले आहेत. अजून किमान अडीच महिने ही दरवाढ राहील.

कडाक्याच्या थंडीमुळे मागणीत वाढ
मागणी वाढण्याचे कारण अंडी ही उष्ण असतात. त्यामुळे शरीराला उष्णता मिळावी यासाठी हिवाळ्यात प्राधान्याने अंड्यांचे सेवन केले जाते. त्यामुळे थंडीच्या हंगामात सर्रास अंड्यांच्या किंमतीत वाढ होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 17/Dec/2024