रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि रेनट्री फाउंडेशन यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि एकात्मिक विकासासाठी पर्यावरण संरक्षण, जलसंधारण विकास, ग्रामीण उपजीविका आणि समाजकल्याण या क्षेत्रांमध्ये एकत्र काम करण्यासाठी आज सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या प्रकल्पातून जैवविविधतेचे संरक्षण, जलस्रोतांचे सक्षमीकरण, ग्रामीण जीवनमान सुधारणा तसेच सर्वसमावेशकता आणि समुदाय कल्याणाला प्रोत्साहन असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

रत्नागिरीत झालेल्या करारानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार म्हणाले, जिल्ह्यात विकासात्मक आणि शाश्वत उपक्रम यशस्वीपणे राबवण्याचा प्रयत्न आहे. रेनट्री फाउंडेशन सोबतची ही भागीदारी चालू असलेल्या प्रयत्नांना अधिक कौशल्य आणि अचूक दृष्टिकोन देईल. या करारामुळे नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करता येईल. जिल्ह्यातील शाश्वत परिसंस्थेला चालना देऊन आणि समुदायांना सक्षम बनवणे शक्य होईल. त्यामुळे रत्नागिरी केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात एक आदर्श जिल्हा बनवण्यासाठी हे पहिले पाऊल आहे.
या वेळी रेनट्री फाउंडेशनच्या संस्थापक लीना दांडेकर म्हणाल्या, रेनट्री फाउंडेशनमध्ये आमचे उद्दिष्ट नेहमीच शाश्वत, सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून सक्षम समाज आणि शाश्वत परिसंस्था निर्माण करणे हे आहे. पुण्यातील वेल्हे येथे रेनट्री फाउंडेशनने दिलेल्या योगदानामुळे स्थानिक समुदायांना सहभागी करून घेतल्याने होणारे सकारात्मक बदल दिसून आले आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेसोबत भागीदारी केल्याचा आम्हाला अभिमान आहे. यामध्ये शास्त्री नदी खोऱ्यावर आमचे लक्ष केंद्रित केलेले आहे. जैवविविधतेचे संरक्षण करणे, जलस्रोतांचे सक्षमीकरण करणे आणि ग्रामीण जीवनमान सुधारणे तसेच सर्वसमावेशकता आणि समुदाय कल्याणाला प्रोत्साहन देणे हे ध्येय आहे.
पश्चिम घाटक्षेत्रात काम करणारी संस्था
दांडेकर कुटुंबाने २०१८ मध्ये स्थापन केलेली रेनट्री फाउंडेशन मानवी आणि नैसर्गिक अशा दोन्ही प्रकारच्या शाश्वत, मजबूत आणि समृद्ध परिसंस्था निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे. पर्यावरणाच्या देखभालीसाठीचे सामुदायिक उपक्रम ही संस्था राबवते. हवामान, समुदाय आणि जैवविविधता या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणारे उपक्रम संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) ठरवलेल्या १७ शाश्वत विकास उद्दिष्टांची (SDGs) पूर्तता करण्याचा प्रयत्न करत आहे. ही संस्था भारताच्या पश्चिम घाट क्षेत्रात काम करते. युनेस्कोने या घाटाला जागतिक जैवविविधतेच्या दहा महत्वपूर्ण स्थळांपैकी एक म्हणून मान्यता दिली आहे, असे दांडेकर यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:08 17-12-2024














