चिपळूणचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवा : माजी आमदार रमेश कदम

चिपळूण : चिपळूण नगर परिषद स्थापनेला पुढील वर्षी दीडशे वर्षे होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन न.प.ने चिपळूण शहराची दीडशे वर्षांपासूनच्या वाटचालीचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन करावे. त्याचप्रमाणे शहरात स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभे राहावे आणि येणाऱ्या दीडशे वर्षाच्या स्थापनादिनी महोत्सव आयोजित करावा, अशा भावना चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी व्यक्त केल्या. सोमवारी न.प.तर्फे आयोजित १४८ व्या स्थापना दिन कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

चिपळूण न.प.ची १६ डिसेंबर १८७६ रोजी स्थापना झाली. त्याला आजच्या दिवशी १४८ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त मुख्याधिकारी तथा प्रशासक विशाल भोसले यांच्या संकल्पनेतून सोमवारी न.प. मध्ये स्थापना दिन कार्यक्रम झाला. यावेळी नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर तसेच दिव्यांगांसह मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. आपल्या प्रास्ताविकात मुख्याधिकारी भोसले यांनी, दीड शतकीकडे वाटचाल करणाऱ्या चिपळूण न.प.मध्ये मुख्याधिकारी म्हणून काम करण्यास संधी मिळाल्याचा आनंद व अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त केली.

माजी उपनगराध्यक्ष बापू काणे म्हणाले, १९७६ साली न.प.ला शंभर वर्षे पूर्ण झाल्यावर तत्कालीन न.प. मधील प्रशासन व लोकप्रतिनिधींनी महोत्सव साजरा केला. त्यावेळी स्मरणिका प्रसिद्ध करून शहराच्या ऐतिहासिक वाटचालीचा आढावा घेतला. आता दीडशेचा महोत्सव साजरा करताना केवळ इव्हेंट होऊ नये तर शहराची कालची, आजची व उद्याची स्थिती कशी असेल याच्या विकासाचा रोड मॅप सर्वांनी मिळून तयार करावा.

माजी आ. रमेश कदम म्हणाले, नगरसेवक ते आमदार या कालावधीत आपण कुटुंबप्रमुख म्हणून जनतेची जी सेवा केली, त्याचा वेळोवेळी फायदा झाला. न.प.त काम करीत असताना याच चिपळूण नगरपालिकेने राज्यातील व कोकणातील पहिला कचरा प्रकल्प, इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्र, पहिली पाणी योजना कामथे येथील धरणावरून सुरू केली. त्या-त्या वेळी काम करताना विरोधक होते. मात्र, ज्येष्ठ व समंजस विरोधक नेहमी पाठीशी होते. असेच काम पुढेही राज्यकर्त्यांनी करावे, अशी अपेक्षाही व्यक्त केल्या.

शहराला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास
इतिहास अभ्यासक प्रकाश देशपांडे म्हणाले, शहराला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. त्या बाबतचे पुरावे अद्यापही शहरात मिळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पशनि चिपळूण शहर पावन झाले आहे. त्यांनी तब्बल एक महिना चिपळूण शहरात मुक्काम ठोकला होता. स्वा. वि. दा. सावरकर १९२४ सालात चिपळुणात सहभोजनासाठी उपस्थित होते. या शहरात कवी माधव यांसारखे साहित्यिक, डॉ. काशिनाथ घाणेकर, शंकर घाणेकर यांसारखे कलावंत होऊन गेले. अशी ही समृद्ध इतिहास कलावंत, साहित्यिक, शाहिरांची भूमी म्हणून चिपळूणची ओळख आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:12 PM 17/Dec/2024