शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अडीच वर्षांसाठी संधी : उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर : मंत्री म्हणून रविवारी शपथ घेतलेल्या प्रत्येकाचा कार्यकाळ अडीच वर्षे असेल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले आहे. रविवार्चाय मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा नागपुरात मेळावा पार पडला. या मेळाव्यात त्यांनी सांगितले की, रविवारी शपथ घेणाऱ्या प्रत्येक मंत्र्याचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असेल.

सोबतच कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवार यांनी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, लवकरच सुनील तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे गटाचा एक नेता असे तिघेजण एकत्र बसून येत्या दोन महिन्यांत महामंडळांवरील निवडी पार पडणार आहेत. मंत्रिमंडळात सगळ्यांना संधी देता येत नाही. काही जणांना मागच्या वेळी दीड वर्षांची टर्म मिळाली, असे अजित पवारांनी सांगितले.

आम्ही आता ५ वर्षांत मंत्र्यांना अडीच अडीच वर्षे संधी देण्याचे निश्चित केले आहे. आमचे त्यावर एकमत झाले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:36 PM 17/Dec/2024