सर्व मंत्र्यांच्या कामाचे होणार ऑडिट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे कामाचे ऑडिट केले जाईल. कामगिरी समाधानकारक नसल्यास मंत्रिमंडळात इतरांना संधी दिली जाईल. आमचे तिन्ही पक्षांचे त्या पद्धतीचे धोरण ठरले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ‘रामगिरी’ येथे पत्रकार परिषदेत दिली.

राजभवन येथे मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. ३९ मंत्र्यांना शपथ देण्यात आल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन प्रामुख्याने उपस्थित होते. खातेवाटपासंदर्भात दोन दिवसांत निर्णय होईल, तर पालकमंत्रिपदाच्या बाबतीत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकत्रितपणे निर्णय घेतला जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. हे मंत्रिमंडळ आहे. काही जुनेजाणते, तर काही नवे असे सर्वसमावेशक आहे. ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही अशा अनुभवी आमदारांकडे वेगळी जबाबदारी देण्याचे ठरविले आहे. काहींना कामगिरी समाधानकारक नसल्याने वगळले आहे, असे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेतापदाबाबत विधानसभेचे अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील, असे फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षाने सकारात्मक राजकारण करावे, चर्चा करावी, आम्ही त्यांचा आवाज दाबणार नाही. मात्र, लोकसभेसारखा त्यांनी कामातून पळ काढून मीडियासमोर बोलू नये, ही लोकशाही नव्हे, असा सबुरीचा सल्लादेखील त्यांनी दिला.

विरोधकांनी ईव्हीएमसंदर्भात प्रश्न उपस्थित केले असले, तरी ईव्हीएमचा अर्थ ‘एव्हरी व्होट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र, एव्हरी व्होट फॉर महाराष्ट्र,’ असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात गतिशील सरकार देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 17/Dec/2024