खेड : गरम पाण्याच्या कुंडाची महाराजा प्रतिष्ठानकडून स्वच्छता

खेड : खेड शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या गरम पाण्याच्या कुंडाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने याला बकाल स्वरुप प्राप्त झाले होते. गवत, दारुच्या रिकाम्या बाटल्या आणि कचऱ्याने हे कुंड व्यापले होते. खेडमधील महाराजा प्रतिष्ठानने याकडे लक्ष घालून या कुंडाची साफसफाई केली. या कुंडाला गतवैभव मिळवून देण्यासाठी हे प्रतिष्ठान सरसावले आहे.

रत्नागिरी जिल्हा समाजसेवक व देशभक्तांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. रत्नागिरी जिल्ह्याला खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अनेक गडकोट तसेच ऐतिहासिक वास्तू रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. त्यापैकीच खेड तालुक्यात असणारे गरम पाण्याचे कुंड. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे हे कुंड गेली अनेक वर्ष दुर्लक्षित आहे. किंबहुना खेडमध्ये गरम पाण्याची कुंड आहे याची अनेकांना कल्पना देखील नाही. मोठे गवत, रिकाम्या दारूच्या बाटल्या आणि कचऱ्याने हे कुंड पूर्णपणे झाकून गेले होते. हे ठिकाण तळीरामांचा अड्डा बनल्याचे दिसून आले. दारूच्या बाटल्यांचा खच त्या ठिकाणी पडला होता.

महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने या कुंडाची स्वच्छता मोहीम करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार सकाळी सहा वाजल्यापासून महाराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत वैद्य, उपाध्यक्ष डॉ. परेश मळणगावकर, सचिव प्रणव मापुस्कर तसेच प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सचिन वानखेडे, नरेंद्र जाधव, गणेश सानप, राहुल तुगावकर यांनी सर्व परिसर स्वच्छ केला. अजून दोन ते तीनवेळा स्वच्छता मोहीम राबवून हे कुंड हे स्वच्छ व प्रेक्षणीय ठिकाण होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या कुंडाची योग्य व्यवस्था प्रशासनामार्फत व्हावी, अशी अपेक्षा प्रतिष्ठानतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:16 PM 17/Dec/2024