रत्नागिरी : कधीकाळी रानावनातून खुडून आणलेल्या हिरव्यागार वडाच्या पानाच्या पत्रावळीच्या जेवण पंगती बसलेल्या दिसायच्या. त्यातील काडी तोंडात जाऊ नये, म्हणून जेवण करणारा काळजी घेतच भोजनाचा आनंद लुटायचा. हे दृश्य पहात मोठ्या झालेल्या पिढीला आता मात्र जमाना बदल गया, असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण आता वडाच्या पत्रावळीच गायब झाल्या असून, त्याची जागा सिल्व्हर कोटेड प्लेटने घेतली आहे.
लग्न समारंभात वडाच्या पत्रावळ्यांची जागा केव्हाच थर्माकोलने घेतली होती मात्र थर्माकोल वर बंदी आल्यानंतर मशिन द्वारे तयार होणाऱ्या सिल्व्हर कोट पत्रावळीची सध्या चलती दिसून येत आहेत. पूर्वीच्या काळच्या वडाच्या पानांचे द्रोण व पत्रावळी हद्दपार झाल्याचे पाहायला मिळत आहे.
वडाच्या पानांपासून बनविलेले द्रोण व पत्रवाळी, तसेच केळीचे पाने याला पूर्वी खूप महत्त्व होते; मात्र तंत्रज्ञानाच्या युगात मशिनवर तयार होणाऱ्या स्वस्त मिळणाऱ्या पत्रावळींना पसंती मिळू लागली आहे; मात्र याचा वापर पर्यावरणास व मानवी आरोग्यास घातक आहे. केळीच्या, वडाच्या पत्रावळीवर जेवण आरोग्यस हितकारक आहे, पण याचा विचार कोणीही करत नाही. जीवनमानातील बदलांमुळे शहरात वडाच्या पत्रावळींची जागा स्टीलच्या ताट-वाट्यांनी घेतली होती. त्यानंतरच्या काळात अंगणातील पंगत संस्कृती लोप पावत चालली आणि त्याची जागा बुफे लंच-डिनरने घेतली.
या बुफे पद्धतीत मोठ्या ताटांची जागा छोट्या प्लेटसनी घेतली. छोट्या गावांतील लग्नसमारंभात व इतर कार्यक्रमांत जेवण्यासाठी वडाच्या पानांपासून तयार होणारी पारंपरिक पत्रावळ वापरात होती; मात्र आता ती तिथूनही हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. त्याजागी आता खेडोपाडीही होणाऱ्या छोट्या-मोठ्या लग्न समारंभात व इतर कार्यक्रमांतदेखील कागदाच्या तयार केलेल्या पत्रावळींनी जागा घेतली आहे.
मशिनद्वारे पत्रावळ्यांची निर्मिती…
शहरासह तालुक्यातील काही गावांत मशिनद्वारे पत्रावळी तयार करण्यात येत आहेत. त्याच प्रमाणे पेपर डिश, सिल्व्हर कोटेड पत्रावळी तयार करण्यात येत आहे. विविध सण, समारंभ, धार्मिक विधीवेळी असणाऱ्या जेवणासाठी सिल्व्हर कोटेड पत्रावळी प्लास्टिक ग्लास, चहा साठी पेपर कपला प्राधान्य दिले जात आहे.
प्लास्टिक बंदी ठरतेय कुचकामी…
सन २०१८ पासून शासनाने यावर बंदी घातल्यावरही पुन्हा पारंपरिक व आरोग्यवर्धक अशा पानांच्या पत्रावळींना चांगले दिवस येतील असे वाटू लागले होते, मात्र शासनाच्या कागदोपत्री बंदीचा यावर कोणताही परिणाम झाला नाही. शासनाच्या प्लास्टिक बंदीला गावोगावी हरताळ फासला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:30 PM 17/Dec/2024









