कडवई : शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या मागे न धावता संगमेश्वर तालुक्यातील शुभम दोरखडे याने आपली पावले शेती व्यवसायाकडे वळवली आहेत. त्याने आपल्या जागेत विविध भाज्यांची लागवड केली असून, त्याला चांगले उत्पन्न मिळत आहे. यातून शेतीपासून दूर पळणाऱ्या तरुणांपुढे त्याने आदर्श उभा केला आहे.
कोकणात थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. या दरम्यान कोकणामध्ये भातशेतीची कामे पूर्ण झाली असून, हिवाळी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथील युवा शेतकरी शुभम दोरखडे आपल्या शेतात हिरवी मिरची, भेंडी, पालेभाज्या यांचे उत्पादन घेत आहे. गेली चार ते पाच वर्षे तो आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत आहे.
नोकरीच्या शोधात न पडता पाच वर्षात त्याने पाच गुंठे जमिनीवर कलिंगड लागवड केली आहे. नोव्हेंबर महिन्यात कलिंगड शेतीसाठी आवश्यक असलेले मळे तयार करून ठिंबक सिंचन योजना तसेच शेतीसाठी आवश्यक असणारे अन्य साधन सामग्री उपलब्ध करून त्याने कलिंगड लागवड केली आहे. आता त्यांच्या शेतात कलिंगड रोपे वाढ घेत आहेत. काही दिवसांत त्याला फुलोरा सुद्धा तयार होऊन पुढील दोन महिन्यांत पिक तयार होईल. योग्य मशागत आणि निगा राखल्याने फळांमध्ये गोडवा असतो. त्यामुळे साहजिकच यांना मागणीही जास्त आहे. फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात कलिंगड तयार होऊन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
मी दापोली कृषी विद्यापीठातून ही पदवी प्राप्त केली आहे. त्यामुळे या पिकांबद्दल योग्य ती माहिती आहे. यामध्ये मला माझी आई बाबा आणि बहीण यांचे मोलाचं सहकार्य मिळत आहे. –शुभम दोरखडे युवा शेतकरी, लोवले
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:00 PM 17/Dec/2024














