नागपूर-मडगांव एक्स्प्रेस नियमित सुरू करण्याची मागणी

रत्नागिरी : विदर्भ-खान्देशातील नागरिकांना कोकणात ये-जा करण्यासाठी मध्यरेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागपूरकडून प्रवाशांच्या मागणीनुसार चालवण्यात येणारी नागपूर-मडगांव साप्ताहिक एक्स्प्रेस नियमित सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी कल्याण-सावंतवाडी संस्थेचे प्रांतप्रमुख वैभव बहुतुले यांनी खासदारांकडे केली आहे.

चंद्रपूर येथील महाकाली मंदिर, वर्धा सेवाग्राम येथील महात्मा गांधी यांचे आश्रम, नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षाभूमी, अमरावती येथील मोझरी संत तुकडोजी व गाडगेबाबा यांचे स्मारक, मूर्तीजापूर जवळील कारंजा येथील दत्तमंदिर, नागझरी येथील गोमाजी महाराज मठ, शेगांव येथील विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या श्री गजानन महाराज मंदिर शीतला माता मंदिर बंकटलाल सदन कृष्णाजींचा मळा महालक्ष्मी मंदिर, सिंधखेडराजा येथील माँ जिजाऊ यांचे जन्मगाव, नांदुरा येथील १०५ फुटी उभी हनुमानाची मूर्ती, अहमदनगर जिल्ह्यातील मनमाड जंक्शनजवळील श्री साई बाबा संस्थान शिर्डी, नाशिक येथील त्र्यंबकेश्वर, कोकणातील दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या कुणकेश्वर मंदिर, कणकवली येथील भालचंद्र महाराज, मालवण येथील भराडी मंदिर, वेंगुर्ले येथील सातेरी मंदिर, सावंतवाडी येथील लाकडी खेळण्यांचे बाजारपेठ अनेक भाविक भक्त कोकणातून खान्देश विदर्भात व विदर्भ खान्देशातून कोकण प्रांतात पर्यटनासाठी येऊ शकतील. त्यासाठी नियमित रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण-सावंतवाडी संस्थेकडून केली जात आहे. या सेवेमुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथील हापूस आंबा व प्रक्रिया पदार्थ घेता येईल तसेच शेतमालाच्या आयात निर्यातीमुळे बाजाराला उद्योगक्षेत्राला चालना मिळणार आहे. बहुतुले यांनी केलेल्या मागणीनुसार, निवेदनाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा, केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना पाठवण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:49 17-12-2024