गुहागर चौपाटीवर कऱ्हाडच्या तरुणाला बुडताना जीवरक्षकाने वाचविले

गुहागर : गुहागर चौपाटीवर मित्रांसोबत आलेल्या तरुणाला समुद्रात आंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडताना गुहागर नगरपंचायतीच्या जीवरक्षकाने वाचवले. ही घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजता घडली.

गुहागर तालुक्याला लाभलेल्या अथांग समुद्र चौपाटीमुळे पर्यटक गुहागरात हजेरी लावतात, डिसेंबरमध्ये पर्यटकांचा ओघ जास्तच आहे.

गुहागर चौपाटीची आणि स्वच्छ समुद्राची भुरळ ही घाटमाथ्यावरील पर्यटकांना अधिक असते. मंगळवारी कऱ्हाड येथून अजित डुंबरे हे अन्य ११ मित्रांसोबत गुहागर फिरायला आले होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास गुहागर पोलिस ठाण्याच्या मागील चौपाटीवर मौजमजा करण्यासाठी आले होते. त्यातील काहीजण समुद्रात आंघोळीसाठी उतरले. अजित डुंबरे यांना चांगले पोहता येते; परंतु तोडलेल्या जेटी शेजारी पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. मित्र बुडतो हे कळताच त्याच्या सहकाऱ्यांनी ओरडा केला. याचवेळी किनाऱ्यावर असलेल्या संगम मोरे यांनी लगेचच किनाऱ्यावरील नगरपंचायतीचा जीव रक्षक प्रदेश तांडेल याला हा प्रकार सांगितला.

तांडेल याने क्षणाचाही विलंब न घालवता रेस्क्यू बोर्ड घेऊन अजित डुंबरे याला काही क्षणात किनाऱ्यावर आणले. त्याला बाहेर काढण्यासाठी किनाऱ्यावरील सहकाऱ्यांनी दोरी टाकून मोठी मदत केली. अजित याने बाहेर आल्यावर प्रदेश तांडेल आणि सहकाऱ्यांचे आभार मानले. त्याला वाचवण्यासाठी निहाल तोडणकर, संगम मोरे, सदाम बागकर यांनी सहकार्य केले.

पर्यटकांचे सूचनांकडे दुर्लक्ष
किनाऱ्यावर आंघोळीसाठी येणाऱ्या पर्यटकांवर नगरपंचायतीच्या जीवरक्षकांचे लक्ष असते. मात्र, कराडवरून आलेले अजित डुंबरे व त्याच्या मित्रांना प्रदेश तांडेल याने खोल पाण्यात जाऊ नये, अशा सूचना दिल्या होत्या. परंतु, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असे प्रदेश तांडेल याने सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 AM 18/Dec/2024