चिपळूण : रेशन दुकानातील ग्रामपातळीवरील दक्षता समिती कागदावरच

चिपळूण : रेशन दुकानातील ग्रामपातळीवरील दक्षता समित्यातील अध्यक्ष, सचिव, सदस्य निवडण्यात आलेले नाहीत. काही ठिकाणी नामधारी समित्या असल्यामुळे दक्षता समिती केवळ कागदोपत्रीच राहिलेल्या आहेत. त्या समित्या सक्रिय झाल्या पाहिजे त्यासाठी तहसीलदारांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महमुद्दीन सय्यद यांनी केली.

ते म्हणाले, ग्रामपातळीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रेशन दुकानांतून वितरण करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर देखरेख ठेवण्याकरिता अध्यक्ष, सचिव, सदस्य अशी १२ अशासकीय पदे असलेल्या दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या. अशासकीय समितीमध्ये गावातील अध्यक्ष सरपंच, तलाठी, सचिव, सदस्यांमध्ये विविध कार्यकारी सोसायटी, तीन महिला, विरोधी पक्षाचे दोन सदस्य, अनुसूचित जाती प्रतिनिधी, अनुसूचित जमाती प्रतिनिधी व एक सामाजिक कार्यकर्ता इत्यादींचा समावेश आहे. ज्या ठिकाणी रेशन दुकान आहे, अशा ठिकाणी या समित्या कार्यरत असणे गरजेचे आहे. या समित्यांचा कालावधी केवळ तीन वर्षांकरिता असतो. तीन वर्षे पूर्ण झाली की, नव्याने ग्रामसभेद्वारे अशासकीय पदाधिकारी यांची निवड केली जाते. निवड झाल्यानंतर प्रत्येक महिन्यातून एकदा बैठक घेतली जाते. नियमित बैठका घेऊन बैठकीचा अहवाल तहसीलदार यांना पाठवावा लागतो. सर्व दक्षता समित्यांच्या बैठका वेळच्या वेळी घेतल्या जातात किंवा नाही याची खातरजमा जिल्हास्तरावरील अप्पर जिल्हाधिकारी यांनी करणे आवश्यक आहे; मात्र दक्षता समितीतील अशासकीय सदस्यांनी एकही बैठक वा भेटी रास्त भाव दुकानदारांना दिले गेले नसल्याचे निदर्शनास दिसून येते. दक्षता समितीतील पदाधिकारी केवळ आता नामधारी ठरले आहेत.

समितीची कामे
शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा रास्त भाव दुकानांतून केला जातो किंवा नाही तपासणे, बनावट, खोट्या शिधापत्रिका व शिधापत्रिका न मिळालेल्या गरजू रहिवासी याबाबत आढावा घेणे, धान्य दुकानातून गैरप्रकारांना आळा घालणे, गावातील प्राप्त तक्रार नोंदवही तपासणे व इतर अशी अनेक कायें दक्षता समितीमार्फत पार पाडली जातात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 18/Dec/2024