नवी दिल्ली : राज्यसभेत संविधानाच्या मुद्द्यावरून बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेससह विरोधकांवर जोरदार घणाघात केला. आतापर्यंत काँग्रेसने सर्वाधिक वेळा संविधानात संशोधन करताना नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचे हनन केल्याचं अमित शहा म्हणाले.
मुस्लिम पर्सनल लॉचा उल्लेख करत अमित शहा यांनी काँग्रेसला घेरलं. यावेळी अमित शहा यांनी युनिफॉर्म सिविल कोड म्हणजेच समान नागरी कायद्याबाबत मोठं विधान केलं.
काँग्रेसने स्पष्ट करावं की एक कायदा असावा की नको. त्यांनी मुस्लिम पर्सनल लॉसोबत हिंदू कोड बिल सुद्धा आणलं. आम्हाला वाटतं की कायदे नवे हवेत. हिंदू कोड बिलमध्ये कोणताच जुना नियम नाहीय. सामान्य कायद्यालाच यांनी हिंदू कोडबिल नाव दिलं. पर्सनल लॉ असावा असं मानलं तर पूर्ण शरिया लागू करा. लग्न आणि घटस्फोटासाठी पर्सनल लॉ, ध्रुवीकरणाची सुरुवात इथूनच झाली. आम्ही उत्तराखंडमध्ये युसीसी आणण्याचं काम केलं. आमचं सरकार इतर राज्यातही युसीसी आणेल असं अमित शहा यांनी राज्यसभेत सांगितलं.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधानात पहिल्यांदा सुधारणा केली यावर बोलताना अमित शहा म्हणाले की, काँग्रेस पक्षाने तेव्हा मुलभूत अधिकारांशी छेडछाड केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावून घेतलं. काँग्रेसने जेव्हा जेव्हा सुधारणा केल्या तेव्हा तेव्हा सर्वसामान्यांचे मुलभूत अधिकार हिरावले गेले. अनेक हुकूमशहांचा गर्व आणि अभिमान नाहीसा करण्याचं काम देशाच्या जनतेनं लोकशाहीच्या माध्यमातून केलं असल्याचं अमित शहा म्हणाले.
गेल्या ७७ वर्षात १६ वर्षे भाजपची देशात सत्ता होती. यात आम्ही २२ वेळा संविधानात संशोधन केलं, पण काँग्रेसने ५५ वर्षात ७७ वेळा संविधान बदललं. काँग्रेसने कधी वोट बँकेचं राजकारण केलं तर कधी मुलभूत अधिकार नाकारण्यासाठी संविधान बदललं असा आरोप अमित शहा यांनी राज्यसभेत केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 18-12-2024














