रत्नागिरी जिल्ह्यात वर्षभरात 9 खून

रत्नागिरी : जिल्ह्याचा गुन्हेगारी आलेख इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे; परंतु अधूनमधून घडणाऱ्या खून आणि खुनी हल्ल्याच्या घटनांनी जिल्हावासीयांना हादरा बसत आहे. जमिनीचे वाद, घरगुती कारणांमुळेच खुनाचे प्रकार घडत आहेत, वर्षभरात जिल्ह्यात ९ खून, ११ जणांवर खुनी हल्ल्याच्या प्रकारांची नोंद झाली आहे. यापैकी बरेचसे प्रकार उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे.

शांत जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरीत खुनाच्या घटनांचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणांचे काम वाढले आहे. कोकण रेल्वे, जलमार्ग, रस्त्यांचे विस्तारीकरण आदींमुळे गुन्हेगार रत्नागिरी जिल्ह्यात आश्रयाला येत आहेत, हे तपासातून उघड झाले आहे. रत्नागिरीत खून करून मुंबई, पुणे, कर्नाटकात पसार होणारे अनेक गुन्हेगार आहेत. परराज्य आणि जिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारीत वाढ झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ९ खून आणि ११ खुनी हल्ला झाल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. त्यातील बहुतांशी गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये इंदवटी (ता. लांजा) येथे सहा महिन्यांपूर्वी पश्चिम बंगाल येथून मामीला घेऊन आलेला भाचा आम्ही नवरा-बायको असल्याचे खोटे सांगून राहत होता. महिलेच्या खुनानंतर त्यांच्यातील खऱ्या नात्याचा भांडाफोड झाला होता.

ही आहेत कारणे
वर्षभरात घडलेले खुनांचे प्रकार किंवा हल्ले हे प्रामुख्याने दागिन्यांच्या हव्यासापोटी, घरगुती कारणांमुळे, जमिनीच्या वादातून तर काहीवेळा प्रेम प्रकरणातून झाल्याचे तपासात उघड झाले आहे.

जिल्ह्यात घडलेले खुनाचे प्रकार हे घरगुती वाद. जमिनीचे वाद यातून झाले आहेत: मात्र परजिल्हातून येऊन खून केल्याचा प्रकार जिल्ह्यात घडलेला नाही. जे गुन्हे घडते आहेत, त्यांची उकल होत आहे. काही प्रकरणात तपासासाठी दुसऱ्या राज्यातील आरोपींनाही ताब्यात घेतले आहे. – धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:00 PM 18/Dec/2024