राजापूर : विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आमदार किरण सामंत यांनी राजापूर तालुक्याच्या रचनात्मक विकासावर तत्काळ लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. तालुक्यातील एकशे एक ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांना सोबत घेऊन आपला विकास आराखडा तयार करून हा आराखडा लागलीच पंचायत समिती कार्यालयात सादर करावा, त्या आराखड्याला अनुसरून गावनिहाय कामांना निधीची तरतूद होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आ. सामंत यांनी स्पष्ट केले आहे. तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेमधील कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आ. सामंत यांनी पंचायत समितीच्या किसान भवन सभागृहात सरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांची बैठक घेतली.
या बैठकीत त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीने आपापल्या गावात आवश्यक योजना तसेच रस्ते, पाणी, आरोग्य, पायाभूत सुविधा यांचा प्राधान्यक्रम ठरवून तसा आराखडा तयार करावा, असे सूचित केले. हा आराखडा तयार करताना ग्रामपंचायतींनी संपूर्ण गावाला विश्वासात घ्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तालुक्यात एकूण १०१ ग्रामपंचायती असून त्याअंतर्गत सुमारे २३० पेक्षा अधिक गावे आहेत.
त्यामुळे असा आराखड्यांचा प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी आता ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवकांवर आली आहे. आ. किरण सामंत यांनी विकासाच्या दृष्टीने केलेले आवाहन व ग्रामनिहाय विकास आराखडा तयार करण्याची राबवलेली संकल्पना राजापूर तालुक्याच्या विकासासाठी एक अभिनव उपक्रम ठरणार आहे, असे सर्वत्र बोलले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 18/Dec/2024














