बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचाराविरोधात लांजात धरणे आंदोलन

लांजा : बांगला देश येथे अल्पसंख्याक हिंदुंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाज लांजाच्या वतीने मंगळवारी लांजा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लांजा तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाज लांजा यांनी पंतप्रधान यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, बांगला देशामध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार थांबविण्यात यावेत. बांगला देशाच्या पन्नास जिल्ह्यांमध्ये हिंदू समाजावर दोन हजारहून अधिक जातीय हल्ले झाले.

यामध्ये हिंदू घरे, हिंदू समाजाचे व्यवसाय, हिंदू समाजाची मंदिरे यांच्यावर हल्ल्याचा समावेश आहे.

दरम्यानच्या हल्ल्यांमध्ये असंख्य हिंदू बांधवांची घरे आणि व्यवसाय जाळून उध्वस्त करून अल्पसंख्याक हिंदू समाजाला रस्त्यावर आणले आहे. हिंदू महिलांवर अत्याचार करण्यात आले. हिंदूंवर अत्याचार होत असताना बांगला देशचे लष्कर स्वतः त्या अत्याचाऱ्यांना सहकार्य करत सीसीटीव्ही कॅमेरे मोडून काढतानाचे दृश्य समोर आले आहे. बांगला देशातील नागरी सुरक्षेसाठी असणाऱ्या राज्य संस्थाच अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारास सहाय्य करताना समोर आल्याने संपूर्ण जगभरातील हिंदूंकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. येणाऱ्या काळात हे अत्याचार थांबण्यासाठी प्रयत्न नाही झाले तर संपूर्ण हिंदू समाजाचे बांगला देशातील अस्तित्व धोक्यात येईल अशी शक्यता वर्तवली आहे.

बांगला देशातील हिंदूंच्या मानव अधिकाराचे संरक्षण करणे आणि मानवाधिकाराच्या बाजूने उभे राहणे आपल्या राष्ट्राचे आणि राष्ट्रातील नागरिकांचे कर्तव्य आहे. आज भारताने एक राष्ट्र म्हणून बांगला देशमध्ये असुरक्षित असलेल्या हिंदूंना मानवाधिकारांचे संरक्षण मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे, अशी भावना भारतातील हिंदू समाजाची आहे.

बांगला देशमध्ये होत असलेल्या अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात भारतातील हिंदू समाजात प्रचंड रोष आहे. हिंदू समाजात असलेला रोष या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.

धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला आमच्या भावना पोहोचवू इच्छितो की, बांगला देशमध्ये अल्पसंख्याक हिंदू बांधवांवर होत असलेले अत्याचार थांबण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य अशी भूमिका घेऊन, अल्पसंख्याक हिंदू हिताचे योग्य ते पाऊल उचलावे, असे पत्र देशाचे पंतप्रधान यांना लांजा तहसीलदार प्रियंका ढोले यांच्या माध्यमातून देण्यात आले.

यावेळी लांजा येथील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 18/Dec/2024