रत्नागिरी: जेएसडब्ल्यू वायुगळती : …तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही; जयगड बौद्धवाडीतील ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ८ साखरी बौद्धवाडी तसेच सामग्गी बौद्धजन सेवा संस्थेकडून जयगड येथील वायुगळती घटनेसंदर्भात रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, १२ डिसेंबर रोजी जेएसडब्ल्यू कंपनीच्या परिसरात गॅस गळतीमुळे शेजारील माध्यमिक विद्यामंदिर जयगड व कला वाणिज्य ज्युनिअर कॉलेज जयगडच्या विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी व श्वसनाचा होऊ लागल्याने जिल्हा शासकीय व खासगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले आहे. जेडब्ल्यूचे जनसंपर्क अधिकारी सुदेश मोरे यांना संजय गुरव कुणबीवाडी नांदिवडे यांनी सकाळी १० वाजता गॅस गळती होत असल्याबाबत कळविण्यासाठी फोन केला. मात्र, त्यांनी घेतला नाही.

या प्रकरणी जनसंपर्क अधिकारी सुदेश मोरे व संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करून कार्यवाही करावी तसेच मुलांच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने कंपनीकडून कोणती उपाययोजना केली आहे, याचा लेखी स्वरूपात खुलासा आमच्या वाडीला द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. एच.एन. जी. गॅस प्रकल्प त्वरित बंद करण्यात यावा याबाबतही लेखी स्वरूपात खुलासा त्वरित देत नाही, तोपर्यंत आम्ही मुलांना शाळेत पाठवणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनाच्या प्रती माहितीसाठी रत्नागिरीचे प्रांताधिकारी, पोलिस निरीक्षक जयगड, मुख्याध्यापक माध्यमिक विद्यामंदिर जयगड व जुनिअर कॉलेज कला व वाणिज्य जयगड, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापिका जि. प. मराठी शाळा साखरी जयगड मुख्याध्यापिका यांना देण्यात आल्या आहेत.

या निवेदनानंतर जयगड येथील शाखेच्या माजी सरपंच राजेंद्र जाधव, जयगड शाखेचे अध्यक्ष सुहास सावंत, चिटणीस मंदार सावंत, सर्व कार्यकारिणी व महिला मंडळाने आवाहन केले आहे की, जयगड पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आमच्या या बाबतच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. असे झाले तरच खऱ्या अथनि कंपनी प्रशासनाला जाग येईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 18-12-2024