दापोलीतील भोपण खाडीत दिवसाढवळ्या वाळू उपसा ?

दापोली : दापोली तालुक्यातील भोपण खाडीकिनारी बेकायदेशीर वाळू उपसा करण्यासाठी ठेवण्यात आलेले सक्शन पंप, लोखंडी पाईप, जाळी आणि अन्य साहित्य दापोली महसूल विभागाने कारवाई करून खाडीत बुडविले होते, अशी माहिती महसूल अधिकाऱ्यांनी दिली. मात्र त्यानंतर याच खाडीत रविवार पासून राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे. त्यामुळे या वाळू उपशावरील कारवाईबाबत दापोली महसूल विभागाच्या चालढकल भूमिकेवर आता नागरिकांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

याआधी दापोलीत बेकायदेशीर वाळू उपशावर कारवाई केल्यानंतर पुन्हा वाळू उपसा होऊ नये म्हणून महसूल विभागाने पथक तयार केले होते. मात्र ते पथक सध्या कुचकामी ठरत आहे का, असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे. याआधी दापोलीत महसूल विभागाने कारवाई केलेली बेकायदेशीर वाळू उपशाची यंत्रणा सील केली जात होती किंवा निकामी केली जात होती. मात्र भोपण खाडीतील केलेल्या कारवाईबाबत नागरिकांमधून महसूल विभागाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. आता तरी या खाडीतील वाळू उपसा रोखण्यास महसूल विभाग धाडस दाखवेल का, अशी विचारणा नागरिकांमधून होत आहे.

दापोलीतील भोपण खाडीत बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत दापोली महसूल अधिकारी यांना सांगून कारवाई करू. अभिजित शेटे, गौण खनिज विभाग, रत्नागिरी.

बेकायदेशीर वाळू उपसा करण्यासाठी ठेवलेले साहित्य भोपण खाडीत बुडविण्यात आले. आता भोपण खाडीत कायमचा वाळू उपसा बंद आहे. – शरदकुमार आडमुठे, नायब तहसीलदार, दापोली

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 18/Dec/2024