रत्नागिरी : साडेतीन महिन्यांपूर्वी तालुक्यातील तोणदे येथे पार्टी करताना मद्यप्राशन केलेल्या दोघांचा मृत्यू हा विषारी औषधासाठी वापरलेल्या सोडा बाटलीमधून दारू प्राशन केल्यामुळे झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी एकाविरोधात सोमवार १६ डिसेंबर रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात हयगयीने दोघांच्या मृत्यू कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुदर्शन प्रकाश शिरधनकर (३३, रा. तोणदे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे, तर प्रकरणात विघ्नेश देवेंद्र भाटकर (२४), समाधान प्रकाश पाटील (४६, दोन्ही रा. तोणदे, रत्नागिरी) या दोघांचा मृत्यू झाला होता. २० ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ९ वा. सुमारास तोणदे येथील बीएसएनएल टॉवरखाली सुदर्शन शिरधनकर, विघ्नेश भाटकर आणि समाधान पाटील हे तिघेही पार्टी करण्यासाठी बसले होते. तेव्हा सुदर्शन शिरधनकरने इंग्लिश क्लब सोडा नावाच्या बॉटलमध्ये काय आहे याची कोणतीही खात्री न करता कोणीतरी तणनाशक विषारी औषधासाठी वापरलेल्या त्या बॉटलमध्ये दारू मिक्स केली होती.
त्यानंतर निष्काळजीपणाने व बेजबाबदारपणाने त्याने ती दारू देवेंद्र भाटकर व समाधान पाटील यांना पिण्यास देऊन स्वतः ही प्राशन केली होती. ही विषारी दारू प्राशन केल्यामुळे तिघेही गंभीर आजारी पडले होते. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार केल्यानंतर अधिक उपचारांसाठी कोल्हापूर आणि मुंबईला नेण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरू असताना विघ्नेश भाटकर आणि समाधान पाटील या दोघांचा मृत्यू झाला होता, तर सुदर्शन अजूनही आजारी आहे.
या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक सुनील चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. सुदर्शन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 18/Dec/2024














