रत्नागिरी : तालुक्यातील गोळप कातळवाडी येथे कर्ज देणार्या कंपनीकडून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत सिंधुदुर्ग येथील वित्तीय कंपनीच्या विभाग प्रमुखाने महिलेची 2 लाख 30 हजार 499 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 4 ते 11 नोव्हेंबर 2024 या कालावधीत घडली आहे.
ओमकार पालव (रा. कुडाळ, सिंधुदुर्ग) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात फिर्याद करणार्या महिलेने पूर्णगड पोलिस ठाण्यात सोमवार, दि. 16 डिसेंबर रोजी तक्रार दिली. त्यानुसार फिर्यादी महिला आणि व साक्षीदार हे दोघे गोळप कातळवाडी येथे राहतात. त्यांनी दि. 24 ऑक्टोबर 2024 रोजी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीवरून स्मॉल फायनान्शिअल सर्व्हिसेस या कंपनीचे कर्ज विभागाचे प्रमुख ओमकार पालव याच्याशी संपर्क करून कर्जाची आवश्यकता असल्याचे सांगितले.
यानंतर संशयित ओमकारने फिर्यादी महिलेला 10 ते 12 महिलांचा गट तयार करा, तुम्हाला कर्जपुरवण्याची व्यवस्था करतो, असे सांगत विश्वास संपादन केला. त्या नंतर कर्जाच्या प्रक्रियेसाठी सभासद नोंदणी, भाग-भांडवल फी, नोटरी स्टँप व वकिल कोर्ट फी स्टँप यासाठी संशयित ओमकाल पालवने फिर्यादी महिलेकडून रोख तसेच गुगल पेद्वारे एकूण 2 लाख 30 हजार 499 रुपये स्वीकारून कर्ज मिळवून देतो, असे सांगत कर्ज न देता फसवणूक केली.
या प्रकरणी संशयिताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 318(4),316(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 18-12-2024














