रत्नागिरी : जिल्हा परिषदेमधील कंत्राटी शिक्षक भरतीबाबत गेले काही दिवस गोंधळ सुरू आहे. या भरतीला लागलेले ग्रहण सुटता सुटेना, अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात या भरतीबाबत दोन जिल्ह्यांना स्थगिती दिली आहे. यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेने सावध भूमिका घेत अंतिम टप्प्यात आलेली ही भरती प्रकिया सध्या थांबवल्याचे चित्र दिसत आहे.
शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड व बीएड झालेल्या बेरोजगारांना कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणूक देण्याचा निर्णय ५ सप्टेंबर रोजी घेतला. त्यानुसार आदेश काढले गेले. कंत्राटी तत्वावर नेमणूक मिळाल्यानंतर संबंधीत शिक्षकाला शासनाकडून १५ हजार रुपये मानधन मिळणार आहे. मात्र गेले काही दिवस या भरतीबाबत गोंधळच सुरू आहे. स्थानिक विरुद्ध परजिल्हा असाही वाद रंगला होता.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील रिक्त पदांवर कंत्राटी शिक्षक भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र राज्यातील अन्य दोन जिल्ह्यांनी कंत्राटी भरतीला स्थगिती दिल्यामुळे रत्नागिरीतील प्रक्रियेवरही टांगती तलवार निर्माण झालेली आहे.
पहिल्या टप्प्यात १०६ जणांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत, तर दुसऱ्या टप्प्यात सुमारे चारशे ठिकाणी नियुक्ती देण्यासाठी समुपदेशन प्रक्रिया सुरू आहे. आंतरजिल्हा बदल्या, सेवानिवृत्त होणारे शिक्षक आणि विलंबाने झालेली शिक्षक भरती यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे दिवसेंदिवस वाढतच होती. निवडणुकीपुर्वी रत्नागिरी जिल्हा परिषदेला एक हजार नवीन शिक्षक मिळाले होते. मात्र ही भरती झाल्यानंतर काही शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्त करण्यात आले. परिणामी जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या पुन्हा नऊशेपेक्षा अधिक झाली आहे.
निवडणूक झाल्यानंतर रत्नागिरी जिल्हा परिषदेने ५०६ रिक्त पदांवर कंत्राटी पद्धतीने शिक्षक नियुक्ती केली जाणार होती. त्यातील १०६ जणांना नियुक्तीही दिली गेली. उर्वरित ४०० पदांवर नियुक्ती देण्यासाठी तालुकास्तरावर समुपदेशन प्रक्रिया सुरू केली गेली. मात्र मागील आठवड्यात झालेल्या शिक्षण विभागाच्या दृकश्राव्य पध्दतीने झालेल्या बैठकित वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तोंडी सुचना देत ही प्रक्रिया वेगाने करू नका, असे सांगितले आहे.
मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील समुपदेशन प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली असून फक्त नियुक्ती पत्र देणे बाकी आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच दोन जिल्ह्यात कंत्राटी भरती स्थगित केल्याचे पुढे आले आहे. त्याचाच निर्णय रत्नागिरीतही लागू होण्याची शक्यता आहे. या भरतीत बहुसंख्य स्थानिक डीएड, बीएडधारक तरूण आहेत. प्रक्रिया स्थगित झाली तर त्याचा फटका या तरूणांना बसू शकतो.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 18/Dec/2024














