नागपूर : गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुषंगाने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद बुधवारी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उमटले. शहा यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत ‘भाजपच्या पोटातील ओठावर आले’, अशी टीका विरोधकांनी केली.
‘सध्या आंबेडकर, आंबेडकर म्हणायची फॅशन झाली आहे. एवढे देवाचे नाव घेतले असते तर सात जन्मांसाठी स्वर्ग मिळाला असता’, असे वक्तव्य गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत केले. त्या वक्तव्याचा देशभरातून निषेध करण्यात येत आहे.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही विरोधकांनी अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजप आणि संघावर टीका केली. यासंदर्भात अधिक बोलताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, ‘आम्ही लोकसभेच्या निवडणुकीपासून सरकार संविधान बदलणार हे सांगतोय. आज त्यांच्या पोटातील ओठावर आले आहे. आम्ही गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करतो.’
काँग्रेसेच आमदार भाई जगताप म्हणाले,’डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुषंगाने असे वक्तव्य करणे दुर्दैवी आहे. तसेच ईव्हीएम देवीच्या आशीर्वादाने सत्तेत आलेल्या सरकारच्या डोक्यात सत्तेचा माज गेला आहे. त्यातूनच अशी वक्तव्ये करण्यात येत आहे. हा माज लोकशाहीला मारक आहे. हा खरा संघ आणि भाजपचा चेहरा आहे.’ काँग्रेसेच ज्येष्ठ नेते नाना पटोले म्हणाले,’आंबेडकरांबद्दल भाजपच्या मनात असलेला राग या वक्तव्यातून दिसून आला आहे. यापूर्वीदेखील अशा स्वरूपाची वक्तव्ये भाजपने केली आहेत. आम्ही त्याचा निषेध करतो.’
शाह यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी अशी आग्रही मागणी काँग्रेस आणि विरोधकांनी केली आहे. अशातच अमित शाहांनी केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील वक्तव्यांचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधकांनी या वक्तव्यावर शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी म्हटले की, ‘जे मनुस्मृतीवर विश्वास ठेवतात ते निश्चितपणे आंबेडकरांशी त्यांचे मतभेद असतील. अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या विधानाचा निषेध विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या आवारात केला आहे. काँग्रेसच्या प्रियांका गांधी, वर्षा गायकवाड, रजनी पाटील, प्रशांत पडोळे इत्यादीसह अनेक नेते या निदर्शनात सहभागी झाले आहे. दरम्यान वक्तव्याचे पडसाद आता राज्याच्या विधिमंडळात देखील उमटताना दिसत आहेत.
आंबेडकर यांचे नाव घेण्याचं यांना वावडं का?- नितीन राऊत
या विषयी बोलताना काँग्रेस नेते आणि आमदार नितीन राऊत म्हणाले की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचं यांना वांवडं का? हा देशाचा अवमान आहे. बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी सर्वस्वी असल्याचे ते म्हणाले. तर यावर बोलताना भाजप आमदार अशिष शेलार म्हणाले की, संसदेचा मुद्दा या ठिकाणी कसा मांडला जातो? काही नियम आहेत की नाही? आम्हाला मार्गदर्शन करा. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान हा कांग्रेस ने केला असल्याचे अशिष शेलार म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 18-12-2024












